संवेदनशील गावात स्ट्रायकिंग फोर्स

By Admin | Updated: April 22, 2015 00:26 IST2015-04-21T23:35:49+5:302015-04-22T00:26:14+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : सुरक्षेसाठी जिल्ह्यात १५०० पोलीस, ३५० गृहरक्षक तैनात

Striking Force in Sensitive Village | संवेदनशील गावात स्ट्रायकिंग फोर्स

संवेदनशील गावात स्ट्रायकिंग फोर्स

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (बुधवार) मतदान होत आहे. राजकीय पक्ष अप्रत्यक्षरित्या या निवडणुकीत उतरले असून, कोणत्याही ठिकाणी कायदा व सुरक्षिततेला गालबोट लागू नये म्हणून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात दीड हजार पोलीस व साडेतीनशे गृहरक्षक (होमगार्ड्स) तैनात करण्यात आले आहेत.
विशेषत: संवेदनशील असलेल्या सुमारे ३५ गावांसाठी वा अन्यत्र कोठेही काही घडण्याची शक्यता वाटल्यास १० स्ट्रायकिंग गु्रप्सही सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य वरिष्ठ अधिकारी निवडणूक काळातील सुरक्षिततेबाबत सतर्क असून, आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ३३१ ग्रामपंचायतीत गाव पॅनेल्स निवडणूक आखाड्यात उतरली आहेत. त्याद्वारे ३९७३ उमेदवार निवडणूक रिंगणात असूून, ४ लाख १३ हजार २४३ मतदारांच्या हाती त्यांचे भवितव्य आहे. जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेसाठी ५२८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात पक्षचिन्हांवर ही निवडणूक होत नसली तरी राजकीय पायाभरणी पुरेपूर झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस आहेच, परंतु काही ठिकाणी राजकीय हेवेदावेही आहेत. रत्नागिरी, चिपळूण, खेड या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणात असून, त्यातून मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्यावेळी राजकीय वादंग निर्माण होऊ नयेत, तणाव निर्माण झालाच तर त्यावर नियंत्रण मिळविता यावे, या सर्व शक्यतांचा विचार करूनच हा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी रायगडमधून १००, ठाणे ग्रामीणमधून १००, तर पालघरमधून ३० पोलीस कर्मचारी तसेच या जिल्ह्यांतून प्रत्येकी चार पोलीस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. स्ट्रायकिंग फोर्सचे १३० कर्मचारी, जिल्ह्यातील १०६१ पोलीस कर्मचारी, १७ पोलीस निरीक्षक, ७० सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ३५० गृहरक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, ४ उपविभागीय पोलीस अधिकारी असा ताफा या निवडणुकीचा बंदोबस्त सांभाळणार आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
जिल्हाभरातील या कडक बंदोबस्तामुळे जिल्ह्यात अत्यंत शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रीया पार पडेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)


जिल्ह्यातील ३५ गावांवर करडी नजर
रत्नागिरीतील नाचणे ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय वर्चस्वाची लढाई असून, याआधी युतीत असलेले शिवसेना व भाजपा हे पक्ष आमने-सामने ठाकले आहेत. भाजपाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष या गावचे असून, त्यामुळे दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार रंगलेला असल्याने याठिकाणी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



स्ट्रायकिंग फोर्सचे दहा गु्रप्स शस्त्रसज्ज
निवडणूक मतदानाच्या काळात जिल्ह्यात कोठेही तणावाचे वातावरण निर्माण झाले किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता वाटली तर त्यासाठी स्ट्रायकिंग फोर्स १० गु्रप्स शस्त्रसज्ज ठेवण्यात आले आहेत. या पोलिसांकडे आवश्यक शस्त्रे, दारूगोळा, अश्रूधुराच्या नळकांड्या व अन्य आवश्यक सामग्री असते. मात्र, संवेदनशील गावे असली तरी निवडणूक शांततेत होईल, असा विश्वास पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Striking Force in Sensitive Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.