मागाडे खून प्रकरणातील संशयितांना कठोर शासन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:58+5:302021-02-05T06:59:58+5:30
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील मागाडे खून प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास करून संशयितांना कठोर शासन करा, अशा सूचना आमदार ...

मागाडे खून प्रकरणातील संशयितांना कठोर शासन करा
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील मागाडे खून प्रकरणाचा नि:पक्षपणे तपास करून संशयितांना कठोर शासन करा, अशा सूचना आमदार प्रकाश आवाडे यांनी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना दिल्या. मागाडे कुटुंबीय व नागरिक यांच्यासोबत आवाडे यांनी अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांची मंगळवारी भेट घेतली. कबनूर ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर राजकीय वादातून संदीप मागाडे याचा मागील आठवड्यात खून करण्यात आला. या प्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आठ जणांना अटक केली असून, उर्वरित मुख्य संशयितासह अन्य काही जण अद्याप फरार आहेत. त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कारवाई करा. या घटनेच्या संबंधित असणाऱ्या गुन्हेगारांना आपण पाठीशी घालणार नाही. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी पोलीस दलाने सखोल व नि:पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी केली. यावेळी मागाडे कुटुंबीयांनीही तीव्र भावना व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्या शोभा पोवार, मनीषा कांबळे, नारायण फरांडे, पवन मागाडे, नितीन कामत, मधुकर मणेरे, बबन केटकाळे, सत्यम कांबळे, सुहास कांबळे, नेताजी कांबळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी ०२०२२०२१-आयसीएच-०२ इचलकरंजीत अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांना भेटून आमदार प्रकाश आवाडे व मागाडे कुटुंबीयांनी संशयितांना कठोर शासन करा, या मागणीचे निवेदन दिले.