वीटभट्टी व्यवसायाला परवाना देताना काटेकोर नियमांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:27+5:302021-09-08T04:31:27+5:30

* शेतक-यांचे मोठे नुकसान (कृष्णेचे दुखणे - पूर्वार्ध) शुभम गायकवाड उदगाव : शिरोळ तालुकयातील उदगांव हे मोठे महसूली गाव ...

Strict regulations are required when licensing a brick kiln business | वीटभट्टी व्यवसायाला परवाना देताना काटेकोर नियमांची गरज

वीटभट्टी व्यवसायाला परवाना देताना काटेकोर नियमांची गरज

* शेतक-यांचे मोठे नुकसान

(कृष्णेचे दुखणे - पूर्वार्ध)

शुभम गायकवाड

उदगाव : शिरोळ तालुकयातील उदगांव हे मोठे महसूली गाव आहे. १८00 हेक्टर इतका मोठा गावाचा विस्तार आहे. परंतु गावातील व परगावातील काही व्यावसायिकांनी महसूल विभागाचा कर बुडवून आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात थाटला आहे. गावातील गौण खनिज आपल्या म्हणण्याप्रमाणे वापरून ते स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर तर चुकविला जात आहेच परंतु महसूल विभागाचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय माती चोरीमुळे पात्राची रुंदी वाढली आहे. परिणामत: जलचर परिसंस्था पूर्णत: बिघडली असून वारंवार माशांचा खच पडलेला दिसून येत आहे. माती चोरीमुळे कृष्णा नदीच्या आसपासची निसर्ग परिसंस्था बिघडत चालली आहे. एकंदरीत अवैध माती उत्खनन व महसूल बुडविणा-यांना चांगलाच धडा शिकविण्याची गरज आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गालगत उदगाव व चिंचवाड ही गावे शेतीच्या बाबतीत सधन आहेत. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांत कृष्णा नदीशेजारी असणा-या शेतक-यांनी आपली मळी वीटभट्टी व्यावसायिकांच्या ताब्यात दिल्याने तेथे हवे तसे माती उत्खनन करून आपला व्यवसाय सुरळीत चालू आहे. रॉयल्टी भरल्याचे दाखवून अवैध उत्खनन केले म्हणून याआधीही पुणे लोकायुक्तांनी मोठा दंड ठोठावला आहे. परंतु २०२०-२१ मध्ये या भागात १५ ते १६ वीटभट्ट्या सुरू होत्या. त्यासाठी लागणारी माती येथील नदीपात्राशेजारील मळीतून घेतली जात होती. सलगपणे माती उत्खनन सुरू असल्याने नदीपात्रातील पाणी थेट शेतीत घुसत आहे. परिणामी पाण्याची पातळी किंचत जरी वाढली तरी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उदगांव, चिंचवाड मधील वीटभट्टी व्यवसायाला परवानगी देताना झालेले नुकसान बघून काटेकोर नियमावलीचा आधार घेवून परवाने द्यावेत, अशी मागणी येथील निसर्गप्रेमी करत आहेत.

फोटो - ०७०८२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - माती उत्खननामुळे उदगाव (ता. शिरोळ) येथील पात्रातील पाणी थेट शेतीत शिरत आहे.

Web Title: Strict regulations are required when licensing a brick kiln business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.