कागल शहरात लाॅकडाऊन कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:28+5:302021-05-07T04:25:28+5:30
कागल : कागल शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नगरपालिकेच्यावतीने कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू ...

कागल शहरात लाॅकडाऊन कडक
कागल
: कागल शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नगरपालिकेच्यावतीने कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात बसस्थानक चौकात रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांची ॲन्टिजन रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पंचवीस जणांची तपासणी केली. त्यामध्ये चार जण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.
कागल पोलीस ठाणे , ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्यातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर शहरात काही प्रमाणात वर्दळ सुरूच होती. सकाळी दोन तास निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर कडक लाॅकडाऊनचा निर्णय नगराध्यक्ष माणिक माळी आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी घेतला आहे. यामुळे दोन तासांची ही सवलत बंद केली आहे. केवळ दूध आणि औषध विक्रीसाठी ही सवलत दिली आहे. लाॅकडाऊनमुळे भाजीपाला विक्रेते आणि रस्त्यावरील फेरीवाले तसेच छोटे छोटे व्यापारी त्रस्त झाले आहेत. दोन तासांची विक्री ही बंद केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिकेच्यावतीने व्यापारी आणि भाजीपाला विक्रेत्यांचीही अशी तपासणी केली जाणार आहे.
चौकट शहरात १६५ रुग्ण
कोरोनाची ही दुसरी लाट जानेवारीपासून सुरू आहे. शहरात १६५ रुग्ण आजपर्यंत सापडले आहेत. ०५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ जण बरे झाले आहेत. शहरात विनाकारण फिरत असलेल्या दहा जणावर कारवाई करीत प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. बाजारपेठेतील धान्य व्यापारी आणि छत्रपती संभाजीराजे चौकातील एका दुकानदारावर कारवाई करीत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
फोटो :
कागल येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाॅकडाऊन असतानाही फिरत असलेल्यांची ॲन्टिजन तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.