साळोखेनगरमध्ये फलक फाडल्याने तणाव
By Admin | Updated: May 5, 2015 01:10 IST2015-05-05T01:10:50+5:302015-05-05T01:10:50+5:30
रास्ता रोको आंदोलन : एस.टी.वर दगडफेक; कोल्हापूर-राधानगरी मार्गावर वाहतूक ठप्प

साळोखेनगरमध्ये फलक फाडल्याने तणाव
कोल्हापूर : साळोखेनगरमधील तुळजाभवानी कॉलनी ते वाल्मीकीनगर दरम्यानच्या श्रीराम कॉलनी केएमटी बसथांब्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला डिजिटल फलक अज्ञातांनी फाडला. ही घटना रविवारी (दि. ३) रात्री अकरानंतर घडली. ती सोमवारी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेचे तीव्र पडसाद साळोखेनगर आणि साने गुरुजी वसाहत परिसरात उमटले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी साने गुरुजी केएमटी बसथांब्यासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत नृसिंहवाडीहून राधानगरीकडे जाणाऱ्या एस. टी. बसची काच फुटली. ‘रास्ता रोको’मुळे कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, साळोखेनगरमधील वाल्मीकीनगर येथील जयभीम तरुण मंडळाने बुद्धजयंतीनिमित्त श्रीराम कॉलनी केएमटी बसथांब्याशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेला डिजिटल फ लक लावलेला होता. रविवारी रात्री साडेदहापर्यंत हा फ लक सुरक्षित होता; पण मध्यरात्री अज्ञातांनी त्याचा निम्मा भागच कापून नेला होता. ही घटना सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कार्यकर्त्यांना समजली. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सानेगुरुजी केएमटी बसथांब्यासमोर सकाळी नऊ वाजता घोषणाबाजीसह ‘रास्ता रोको’ केला. ही घटना समजताच शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते तसेच दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले. आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंत रास्ता रोको केल्यामुळे कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक कोलमडली.
आंदोलनादरम्यान रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले हे घटनास्थळी पोहोचले. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी संशयितांना चोवीस तासांत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद
आंदोलकांनी डॉ़ आंबेडकरांची प्रतिमा असलेला डिजिटल फ लक फ ाडणाऱ्या संशयिताविरुद्ध पोलिसांनीच फिर्याद दाखल करून घ्यावी, असा पवित्रा घेतला़ त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी कलम २९५ अन्वये अज्ञातांविरुद्ध फि र्याद दाखल केली आहे़
...तर जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयावर मोर्चा
याबाबत रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, कार्यकर्त्यांनी बुद्धजयंतीनिमित्त लावलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या डिजिटल फलकाची विटंबना झाली आहे. ही घटना निषेधार्ह आहे. या घटनेतील संशयितांवर चोवीस तासांच्या आत कारवाई न केल्यास आज, मंगळवारी जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.(प्रतिनिधी)