हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

By Admin | Updated: October 20, 2014 00:42 IST2014-10-20T00:06:46+5:302014-10-20T00:42:51+5:30

लोकसभेसारखीच स्थिती

Strengthening of Halvankar, Ichalkaranjita Lily | हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

हाळवणकर यांना बळ, इचलकरंजीत कमळ

राजाराम पाटील / अतुल आंबी - इचलकरंजी --विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय, राष्ट्रवादी कॉँग्रेससह भाजप-शिवसेना यांचे उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी इचलकरंजीकरांनी आमदार सुरेश हाळवणकर यांना बळ देत पुन्हा कमळ फुलविले. हाळवणकर व कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यात लढत झाली. आमदार हाळवणकर यांना १५,२२५ चे मताधिक्य मिळाले, तर राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांच्यासह सर्वांनाच अनामत गमवावी लागली.
राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी सकाळी आठच्या सुमारास मतमोजणीस सुरुवात झाली. चौदा टेबलांवर होणाऱ्या मतमोजणीसाठी १८ फेऱ्या होत्या, तर पोस्टल ३३४ मते दोन टेबलांवर मोजली गेली. सुरुवातीच्या फेरीपासूनच हाळवणकर यांनी मताधिक्य घेतले. पहिल्या १४ इलेक्ट्रॉनिक यंत्रांत १ ते १३ यंत्रे कोरोची गावाची व एक तारदाळमधील होते. या फेरीत हाळवणकर यांना ६०३७, आवाडेंना ३७०३ व कारंडेंना ६८६ मते मिळाली. मतमोजणीच्या फेऱ्या मोजल्या जात असताना सुरेश हाळवणकर यांचे मताधिक्य वाढत गेले.
हाळवणकर यांना चंदूर वगळता ग्रामीण परिसरातील चार गावांत मताधिक्य मिळाले, तर शहापूर, नगरपरिषद प्रभाग क्रमांक ७ व ८, विक्रमनगर, प्रभाग क्रमांक २ व ९, तसेच गावभागातील अवधूत आखाडा, टाकवडे वेस, बौद्ध विहार, आंबी गल्ली, श्रीपादनगर, जुना चंदूर रोड परिसरात आवाडेंना, तर उर्वरित शहरात हाळवणकर यांना मताधिक्य मिळाले. राज्यात आघाडी
फुटली आणि भाजप-शिवसेना युती तुटली आणि कॉँग्रेसचे प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे मदन कारंडे, भाजपचे सुरेश हाळवणकर, शिवसेनेचे मुरलीधर जाधव असे उमेदवार उभे राहिले. बहुरंगी लढतीत आवाडे, हाळवणकर यांच्या स्पर्धेत राष्ट्रवादीचे मदन कारंडे यांनीही आपले घोडे पुढे दामटले आणि
रंगत निर्माण केली; पण मतमोजणीनंतर मात्र आवाडे-हाळवणकर अशीच एकास एक लढत झाली आणि आवाडे यांना हार पत्करावी लागली.

पत्रकारांचे ठिय्या आंदोलन
मतमोजणी होणाऱ्या राजीव गांधी सांस्कृतिक भवनमध्ये वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना त्यांच्या कॅमेऱ्यासह प्रवेश देण्यास निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी नकार दिल्याने सुमारे दीड तास पत्रकारांना ठिय्या आंदोलन करावे लागले. ठिय्या आंदोलन सुरू असलेल्या बातम्यांचे वृत्त चित्रवाहिनीवर झळकू लागल्याने अखेर जिरंगे यांना माघार घ्यावी लागली आणि त्यांनी छायाचित्रकार व पत्रकारांना प्रवेश दिला.
‘नोटा’ची १५०५ मते
निवडणुकीसाठी एकूण १ लाख ९९ हजार ९४९ मतदान झाले होते. त्यापैकी ४७.११ टक्के मते हाळवणकरांना, ३९.५ टक्के मतदान आवाडेंना, तर ७.५ टक्के कारंडे यांना मिळाली. तसेच, मतदानाचा (नोटा) हक्क ०.७५ टक्के मतदारांनी बजावला.

पोस्टाच्या १५४मतपत्रिका अवैध
पोस्टामार्फत ३३४ मतपत्रिका मिळाल्या. त्यापैकी फक्त १५० मतपत्रिका वैध ठरल्या. त्यामध्ये ७९ मते हाळवणकरांना, ४९ मते आवाडेंना व १२ मते अन्य उमेदवारांना मिळाली. विशेष म्हणजे १२०० मतपत्रिका पोस्टल मतदारांसाठी पाठविण्यात आल्या होत्या.

लोकसभेसारखीच स्थिती
नुकत्याच झालेल्या एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राष्ट्रीय कॉँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यात २० हजार मतांचा फरक होता. काहीसा कमी होत, तसाच फरक विधानसभा निवडणुकीतही आमदार हाळवणकर-प्रकाश आवाडेंमध्ये राहिला.

कडक बंदोबस्त
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र व शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त नेमला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे, संजय साळुंखे, सतीश पवार यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुख मंजू थापा हे प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. चार दिवस स्ट्रॉँगरूममध्ये ठेवलेल्या मतपेट्यांची सुरक्षा व्यवस्था या दलाने पार पाडली.

Web Title: Strengthening of Halvankar, Ichalkaranjita Lily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.