‘मेक इन इंडिया’साठी उद्योगांना बळ द्या !

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T00:20:13+5:302015-07-25T01:13:30+5:30

एस़ रामास्वामी : एमएसएमई विकास कार्यक्रमांतर्गत उद्योजकांशी संवाद, रिझर्व्ह बँके च्या बँकांना मार्गदर्शक सूचना

Strengthen the industry for 'Make in India'! | ‘मेक इन इंडिया’साठी उद्योगांना बळ द्या !

‘मेक इन इंडिया’साठी उद्योगांना बळ द्या !

कोल्हापूर : ‘मेक इन इंडिया’च्या यशस्वीतेसाठी लघु, सूक्ष्म आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांची निर्मिती आणि विकास अतिशय महत्त्वाचा आहे़ या उद्योगांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत़ बँकाही वित्तीय मदत करण्यास उत्सुक आहेत, त्याचा फायदा उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे संचालक एस़ रामास्वामी यांनी गुरुवारी केले़
येथील रिझर्व्ह बँकेच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या आर्थिक समावेशन विकास विभाग (एफ आयडीडी)आणि जिल्हा अग्रणी बँक बँक आॅफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमएसएमई विकास कार्यक्रमातंर्गत उद्योजकांशी संवाद साधताना ते बोलत होते़ यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी, एफ आयडीडी (आरबीआय)चे महाप्रबंधक चिरंजीव पटनायक, उपमहाप्रबंधक कामेश्वर राव, पी़ मेनन, बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक आऱ एस़ चौहान, बँक आॅफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक पी़ डिसिल्व्हा यांची प्रमुख उपस्थिती होती़
रामास्वामी म्हणाले, ‘मेक इन इंडिया’साठी कौशल्य विकासाची आवश्यकता आहे़ केवळ पतपुरवठा मिळाला म्हणजे उद्योगाला चालना मिळते असे नाही़ उद्योग यशस्वी होण्यासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, वित्तीय कौशल्य आणि विपणन यांची आवश्यकता आहे़ बाजारपेठेत स्पर्धा प्रचंड असल्यामुळे गुणवत्तापूर्ण ब्रँडची निर्मिती करून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उद्योजकांनी प्रयत्न केले पाहिजेत़
एफ आयडीडी (आरबीआय) चे महाप्रबंधक चिरंजीव पटनायक म्हणाले, ‘एमएसएमई’च्या विकासासाठी उद्योजक आणि बँक यांनी परस्परपूरक म्हणून काम करावे़ ‘आरबीआय’ची समिती बँकांनी एमएसएमई क्षेत्राला बँकांनी केलेल्या पतपुरवठ्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेईल़ बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक आऱ एस़ चौहान म्हणाले, ‘एमएसएमई’च्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे़
जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगांनी ‘एमएसएमई’च्या माध्यमातून कृषिमाल आणि वनोत्पदानावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारावेत़ एमएसएमईच्या विकासासाठी प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल़ पंतप्रधान मुद्रा योजनेचा उद्योजकांनी लाभ घ्यावा़
यावेळी ‘सिडबी’चे यशवंत कुलकर्णी, बँक आॅफ महाराष्ट्रचे महाप्रबंधक पी़ डिसिल्व्हा यांनी उद्योजकांना विविध कर्ज योजनांची माहिती दिली़ या कार्यक्रमास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील उद्योजक उपस्थित होते़ पाहुण्यांचा सत्कार ग्रीन प्रमाणपत्र देऊन करण्यात आला़ रवींद्र पोतदार यांनी सूत्रसंचालन केले़ अग्रणी बँकेचे (बँक आॅफ इंडिया) जिल्हा व्यवस्थापक एम़ जी़ कुलकर्णी यांनी आभार मानले़ (प्रतिनिधी)

कापड उद्योगाचे ब्रॅँडिंग हवे
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कापडनिर्मिती केली जात आहे़ या उत्पादनांचे ब्रँडिंग योग्यप्रकारे करून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यावे, असा सल्लाही रामास्वामी यांनी दिला़
वित्तीय पुरवठ्याबाबत माहिती बॅकांनी उद्योजकांना द्यावी
एमएसएमई क्षेत्रांतर्गत उद्योगांची उभारणी, पुनर्वसन आणि पुनर्रचनेसाठीही वित्तीय पुरवठा करण्यास आवश्यक त्या प्रक्रियेची माहिती बँकरनी उद्योजकांना द्यावी़ मध्यम उद्योगांचा समावेशही प्राधान्य क्षेत्रात झालेला आहे़ त्याचा लाभ उद्योजकांनी घ्यावा़ उद्योजक आणि बँक तसेच बँक आणि बँकेच्या व्यवस्थापनामधील वरिष्ठ यामध्ये सुसंवाद प्रस्थापित करावा़ कृषी आणि किरकोळ व्यापार क्षेत्र वगळता दहा लाखांपर्यंतच्या कर्जासाठी उद्योजकांना विनातारण कर्ज द्यावे, असे आवाहनही रामास्वामी यांनी केले़

Web Title: Strengthen the industry for 'Make in India'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.