प्रत्येक विद्यार्थ्यांत वैज्ञानिक होण्याची ताकद
By Admin | Updated: November 30, 2015 01:11 IST2015-11-30T00:52:38+5:302015-11-30T01:11:07+5:30
शरद काळे : नेसरीत बालवैज्ञानिक संमेलन उत्साहात, विज्ञान प्रभातफेरी

प्रत्येक विद्यार्थ्यांत वैज्ञानिक होण्याची ताकद
नेसरी : मुलांनो खेड्यात जन्माला आलो हा न्यूनगंड बाळगू नका, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असल्याची लाजही वाटण्याची आवश्यकता नाही. शिवाय केमस्ट्री, फिजिक्स व बायॉलॉजी म्हणजे विज्ञान नव्हे, तर प्रत्येक गोष्टीत विज्ञान भरलेले आहे. त्याचा शोध घेणे जरुरीचे असून प्रत्येक विद्यार्थ्यात वैज्ञानिक होण्याची ताकद आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, असे प्रतिपादन भाभा अणुशक्ती केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी केले.ते मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज उपविभाग नेसरीद्वारा आयोजित बालवैज्ञानिक संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नेसरी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व पंचायत समिती अॅड. हेमंत कोलेकर होते. यावेळी प्रकल्प संयोजक (मुंबई) अभय यावलकर, डॉ. नूतन खलप यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. शरद काळे व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह एस. एस. मटकर यांनी केले.डॉ. काळे म्हणाले, आमची पिढी चुकली, पण येणाऱ्या पिढ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी प्रयत्न आहे. या भागात प्रचंड जैवविविधता आहे. इथल्या जैवविविधता गोळा करा. त्याचा अभ्यास करून आमच्याकडे काय आहे हे जगाला दाखवा. पृथ्वी हे आम्हाला मिळालेले डिपॉझिट आहे. त्याच व्याज हे सर्वांनी फेडणे गरजेचे आहे. निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान ३ झाडे लावावीत.डॉ. काळे यांनी आपल्या दीड तासांच्या मार्गदर्शनात भारतातील अंधश्रद्धा व संस्कृतीबद्दल माहिती स्पष्ट करत निसर्गाला आम्ही विसरत चाललो आहोत, अशी खंत व्यक्त केली. यावेळी अभय यावलकर, डॉ. नूतन खलप यांनी मनोगते व्यक्त केले. अॅड. हेमंत कोलेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.विज्ञान प्रभातफेरीचा हिरवा झेंडा दाखवून सरपंच वैशाली पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. विज्ञानवादी घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून ही फेरी तुकाराम कृष्णाजी कोलेकर महाविद्यालयात दाखल झाली. दुपारी लहान गट व मोठा गटातील बालवैज्ञानिकांनी आपले प्रकल्प सादर केले.याप्रसंगी उपसरपंच दयानंद नाईक, अंजना साखरे, अर्चना कोलेकर, अनिता मटकर, अशोक पांडव आदी उपस्थित होते, तर समारंभ कार्यक्रमास प्रा. डॉ. एस. डी. पाटील, विनोद नाईकवाडे, निसर्गमित्र अनिल चौगुले, प्रा. कल्याणराव पुजारी, प्रा. अनिल मगर, बी. जी. काटे, रामचंद्र सुतार, अर्चना कोलेकर, कृष्णराव रेगडे, आर. बी. पाटील, प्रा. एस. एल. पाटील बी. बी. कांबळे, आय. टी. नाईक, डॉ. घेवडे, वाय. एस. नाईक, विजय नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)