कुरुंदवाड पालिकेत रिक्त जागांमुळे ताण
By Admin | Updated: September 9, 2016 01:11 IST2016-09-09T01:05:11+5:302016-09-09T01:11:47+5:30
२४ पैकी २१ जागा रिक्त : तीन अधिकारी, एका लिपिकावर कामकाज

कुरुंदवाड पालिकेत रिक्त जागांमुळे ताण
गणपती कोळी - कुरूंदवाड -येथील पालिकेतील राज्य संवर्गातील १४ पैकी ११ जागा, लिपिक संवर्गातील १० पैकी ९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असून, पालिका प्रशासनाचा संपूर्ण कामाचा ताण मुख्याधिकारी यांच्यावर पडत आहे. पदावर असलेल्या केवळ तीन अधिकाऱ्यांवरच पालिकेचा कारभार सुरू असून पालिकेची अवस्था कर्मचाऱ्याविना ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच झाली आहे.
पालिका प्रशासनात प्रत्येक विभागात पदसंख्येनुसार अधिकारी, कर्मचारी असेल तर कोणत्याही कामाचा निपटारा होऊ शकतो. मात्र, आस्थापना खर्चावरून येथील पालिकेतील नोकरभरतीच नसल्याने व सेवानिवृत्त आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवा अधिकारीही नसल्याने शहराच्या विकासाला बे्रक लागला आहे. त्यामुळे विविध योजना राबविणे, लोकप्रतिनिधींच्या सूचना, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत.
पालिकेत राज्य संवर्गातील
१४ पदसंख्या आहे. मात्र,
प्रत्यक्षात सहायक विधी विभाग, संगणक अभियंता व स्वच्छता, पाणीपुरवठा या तीन विभागाव्यतिरिक्त इतर ११ विभागांतील पदे रिक्तआहेत. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचे बांधकाम अभियंता, कर विभाग, लेखा विभाग, आस्थापना विभागात अधिकारीच नसल्याने कामे ठप्प झाली आहेत.
लिपिक संवर्गातील मंजूर दहापैकी केवळ एकच लिपिक आहे. उर्वरित नऊ जागा रिक्त आहेत. पालिका प्रशासनाने पदोन्नतीचा प्रस्ताव पूर्वीच पाठविला असून, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रलंबित राहिला आहे.
उपलब्ध असलेले राज्य संवर्गातील तीन अधिकारी व एका लिपिकावर पालिकेचा कारभार करताना मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर याची दमछाक होत आहे. त्यामुळे कोणत्याही कामाचा वेळेत निपटारा होत नसल्याने पालिका प्रशासनाची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’अशी झाली आहे.
लोकप्रतिनिधींना निवडणुकीचे डोहाळे लागल्याने याकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळच नाही, तर नागरिकांच्या समस्यांना मुख्याधिकारी यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या रिक्त पदाबाबत व पदोन्नतीच्या प्रस्तावाबाबत त्वरित निर्णय घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
दैनंदिन कामाला खीळ
पालिकेत सध्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे वर्ष चालू आहे. शहरातील नवीन बांधकाम, नवी कर आकारणी करणे, बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी पालिकेकडे कर विभागाला अधिकारीच नसल्याने कर आकारणी माहिती खोळंबली आहे. तसेच अग्निशामक विभागातील तीन मंजूर असलेली फायरमन पदेही रिक्त आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या विभागालाही रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. या पदासाठी मुलाखती झाल्या असून, मात्र अद्याप भरती झाली नाही.