अधुरी एक कहाणी...फक्त जागा द्या... मी अभिनेते घडवेन!
By Admin | Updated: August 7, 2014 00:15 IST2014-08-06T22:26:49+5:302014-08-07T00:15:02+5:30
साताऱ्यात अभिनयाच्या अकादमीचे स्मितातार्इंचे स्वप्न काळाने हिरावले

अधुरी एक कहाणी...फक्त जागा द्या... मी अभिनेते घडवेन!
राजीव मुळ्ये - सातारा ‘अस्मिता चित्र’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची सातारा शाखा यांच्या संयुक्त सहभागातून साताऱ्यातील उदयोन्मुख अभिनेत्यांना प्रशिक्षण देणारी अकादमी स्थापण्याचे स्वप्न ज्येष्ठ निर्मात्या, अभिनेत्री स्मिता तळवलकर यांनी पाहिले होते. प्राथमिक नियोजनही झाले होते. मात्र, त्यानंतर लगेच स्मितातार्इंच्या आजाराने उचल खाल्ली आणि हे स्वप्न अधुरेच राहिले. ‘पुण्या-मुंबईतील उदयोन्मुख कलावंतांना प्रशिक्षणाच्या सुविधा लगेच उपलब्ध होतात. साताऱ्यासारख्या भागातील कलावंतांच्या अंगी गुण असूनही त्यांना ही संधी मिळत नाही. परिणामी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये चमकण्याची संधीही दूर जाते. ‘अस्मिता चित्र’च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण अकादमीची शाखा साताऱ्यात सुरू करण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही फक्त जागा उपलब्ध करून द्या आणि ज्यांना मनापासून अभिनय शिकायचा आहे, अशा मुलांना एकत्रित करा. दर शनिवार-रविवारी अकादमी त्यांना प्राथमिक स्तरापासूनचे प्रशिक्षण देईल. त्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातील. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या मुला-मुलींना चित्रपट, नाटकात संधीही उपलब्ध करून दिली जाईल....’ स्मिता तळवलकर यांनी आठ मार्च २०१३ रोजी साताऱ्यात केलेली ही घोषणा! माणदेशी महोत्सवाच्या निमित्ताने साताऱ्यात आलेल्या स्मितातार्इंचा स्थानिक रंगकर्मींच्या वतीने नाट्य परिषदेच्या सातारा शाखेने तत्कालीन नगराध्यक्षा मुक्ता लेवे यांच्या हस्ते हृद्य सत्कार केला होता. दीपलक्ष्मी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मितातार्इंच्या बोलण्यातून त्यांचे साताऱ्याशी असलेले ऋणानुबंध अधोरेखित झाले होते. ‘पोलो रसिक क्लब’ या संस्थेच्या माध्यमातून ‘तू तिथे मी’ या चित्रपटाविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, तेव्हापासूनचे हे ऋणानुबंध! १९९० मध्ये सातारला झालेल्या नाट्य संमेलनाला स्मिताताई उपस्थित होत्या आणि येथील आयोजनाबाबत संतुष्टही होत्या. म्हणूनच सातारला पुन्हा एकदा नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना नाट्य परिषदेच्या मुख्य कार्यवाह या नात्याने त्यांची सक्रिय साथ होती. परंतु साताऱ्यात अभिनय प्रशिक्षण अकादमी स्थापण्याची घोषणा करून त्या मुंबईला परतल्या आणि त्यांचा आजार बळावला. सातारकरांची ही दोन्ही स्वप्ने स्मितातार्इंच्या नजरेसमोर पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. अमेरिकेतील सातारी आविष्कारही केला ‘मिस’ स्मितातार्इंनी सातारकर रंगकर्मींसोबत पाहिलेली दोन स्वप्ने जशी निसटून गेली, तसाच सातारकरांनी अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात केलेला प्रयोग पाहण्याची त्यांची संधीही आजाराने हिरावली. विभागीय पातळीवर यश मिळवून सातारची ‘मी गुलाबबाई’ ही एकांकिका नाट्य परिषदेच्या शाखांतर्गत स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली. तिथे स्मिताताई परीक्षक होत्या आणि त्यांनी निवडलेल्या संघांना अमेरिकावारीची संधी मिळाली. नाट्य परिषदेच्या न्यू जर्सी शाखेने अमेरिकेतील मराठीजनांच्या एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तिथेही परीक्षणाची जबाबदारी स्मितातार्इंवरच होती. परंतु स्मितातार्इंचा आजार बळावला आणि त्या जाऊ शकल्या नाहीत. अन्यथा याच दरम्यान ‘मी गुलाबबाई’ हा सातारी नाट्याविष्कार त्यांना अमेरिकेतील रंगमंचावरही पाहता आला असता.