टॉवरावरच्या ‘डॉन’साठी पेटला जिवघेणा संघर्ष

By Admin | Updated: December 1, 2014 00:00 IST2014-11-30T23:32:23+5:302014-12-01T00:00:40+5:30

कांदेकर-मोरस्कर आमने-सामने : वेळीच दहशत संपविण्याची गरज

Storming struggle for 'Don' on the tower | टॉवरावरच्या ‘डॉन’साठी पेटला जिवघेणा संघर्ष

टॉवरावरच्या ‘डॉन’साठी पेटला जिवघेणा संघर्ष

एकनाथ पाटील = कोल्हापूर -एकेकाळी रंकाळा टॉवरचा ‘डॉन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमेश कांदेकर याच्या निधनानंतर त्याचे लेबल आपल्या नावावर लावण्यासाठी उमेशचा भाऊ हेमंत आणि मित्र रणजित मोरस्कर यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षाला दोन्ही बाजूंनी राजकीय पाठबळ मिळाल्याने स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ते एकमेकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पोलिसांनी सात ते आठ वेळा दोन्ही समर्थकांत मध्यस्थी करून पेटलेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न केला; परंतु काही दिवस शांत झाल्यानंतर पुन्हा ‘डॉन’साठी दोन्ही समर्थकांत संघर्ष पेटला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी चिघळलेला संघर्ष वेळीच शांत नाही केला तर मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रंकाळा टॉवर परिसरात उमेश कांदेकर याच्या पाठीमागे तरुणांची फौज असल्याने कुळे काढणे, हप्तेवसुली करण्यामध्ये त्याची मोठी दहशत होती. त्याच्या खांद्याला खांदा लावून ग्रुपमध्ये मित्र प्रवीण लिमकर (बिल्डर), रणजित मोरस्कर हेदेखील काम करीत होते. मध्यंतरीच्या कालावधीत पैशाच्या देवाणघेवाणीतून याच परिसरातील राजेंद्र लोहार या तरुणाचा खून झाला. या प्रकरणात उमेश कांदेकरला अटकही झाली होती. लोहार गटातील समर्थक हे रणजितचे मित्र; त्यामुळे कांदेकरपासून तो बाजूला झाला. दरम्यान, कांदेकर या खून प्रकरणात तुरुंगात असल्याने प्रवीण लिमकरने या भागात आपला चांगलाच जम बसविला. आपले वर्चस्व वाढू लागल्याने तोही स्वतंत्र झाला. लोहार खून प्रकरणातून बाहेर आल्यानंतर कांदेकरने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. जनसुराज्य पक्षातून नगरसेवकपदही मिळविले.
दरम्यान, त्याच्या आकस्मिक निधनानंतर या परिसराचा ‘डॉन’ बनण्यासाठी मोरस्कर, लिमकर गटांकडून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु उमेशचा भाऊ हेमंत कांदेकर या परिसराचा ‘डॉन’ म्हणून मिरवू लागला. मोरस्करचहीे या परिसरात वर्चस्व वाढू लागल्याने ‘कांदेकर विरुद्ध मोरस्कर’ असा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिघळला. हेमंत कांदेकरने ‘मीच इथला डॉन आहे ’ अशी दमदाटी करीत आपल्या साथीदारांसमवेत मोरस्कर याच्या घरात घुसून खुनी हल्ला केला. दरम्यान, या वादातून मोरस्कर गटाकडूनही कांदेकर गटावर हल्ला झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांत देण्यात आली. दोन्ही गटांवर परस्परविरोधी असे सात गुन्हे दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री तर कांदेकर गटाचे समर्थक भोसले कुटुंबियांनाच राहत्या घरात पेटविण्याचा गंभीर प्रकार घडला. त्यामुळे या संघर्षाने भिषण रुप घेतले असून आताच कडक कारवाई करुन दहशत मोडण्याची गरज आहे.


रंकाळा टॉवर परिसरात वर्चस्ववादातून कांदेकर व मोरस्कर गटांतील समर्थकांनी परिसरातील नागरिकांचे जीवन हैराण करून टाकले आहे. वारंवार एकमेकांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या टोळक्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी या दोन्ही टोळ्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाईल.
- डॉ. मनोजकुमार शर्मा : पोलीस अधीक्षक



पैलवानांचा वापर
परप्रांतीय पैलवानांना राहण्यासाठी जागा देऊन त्यांचा वर्चस्वासाठी ढाल म्हणून वापर होऊ लागला. आजही या भागात पैलवानांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. कांदेकर आणि मोरस्कर गट हे याच पैलवानांच्या जोरावर डॉन बनण्याचे स्वप्न पाहत आहेत.


व्यवसायातही चढाओढ
रणजित मोरस्कर व कांदेकर गटाचा समर्थक किशोर भोसले या दोघांची रंकाळा चौपाटी येथे भेलची गाडी आहे. किशोर हा फेरीवाले संघटनेचा शहर अध्यक्ष बनल्याने रंकाळा चौपाटी येथे त्याचे फेरीवाल्यांत वर्चस्व वाढू लागले. व्यवसायातील चढाओढीतून भोसले-मोरस्कर असा संघर्ष आता उफाळला आहे.

Web Title: Storming struggle for 'Don' on the tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.