लाल बावट्याच्या मोर्चाला ‘तुफान’ गर्दी
By Admin | Updated: June 2, 2015 01:24 IST2015-06-02T01:24:02+5:302015-06-02T01:24:02+5:30
कामगार आयुक्तांना निवेदन : बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास १ जुलैला पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

लाल बावट्याच्या मोर्चाला ‘तुफान’ गर्दी
कोल्हापूर : ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी नोंदणीसाठी अर्ज केलेल्या बांधकाम कामगारांना त्वरित सेवा पुस्तके देण्यात यावीत, सन २०१३ मध्ये नोंदीत व पडताळणी झालेल्या १२०० कामगारांना गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान द्यावे आणि सन २०१२ च्या नोंदीतील ८०७२ कामगारांना तीन हजार रुपये द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सोमवारी शाहूपुरी येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर ‘तुफान मोर्चा’ काढण्यात आला़ नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांना मागण्यांचे निवेदन दिले़
लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्ह्यातील सुमारे पंचवीस हजार सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते़ दुपारी साडेबाराच्या सुमारास लाल बावट्याच्या विजयाच्या घोषणा देत हा मोर्चा दसरा चौक येथून सुरू झाला़ या मोर्चात महिलाही हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या़ मागण्या मान्य केल्यास १ जुलैला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशाराही दिला़
माजी आमदार आणि ‘सिटू’चे राज्याध्यक्ष नरसय्या आडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा चौक, सीपीआर, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौकमार्गे हा भाजप सरकार तसेच कामगार आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत मोर्चा दुपारी दीडच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे येथे पोहोचला़ यानंतर फोर्ड कॉनरमार्गे शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्तालयाच्या कार्यालयाकडे मोर्चा गेला. यावेळी ‘सिटू’चे राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा सचिव शिवाजी मगदूम, ‘माकप’चे जिल्हा सचिव उदय नारकर, भगवान घोरपडे, डॉ. प्रा. सुभाष जाधव, आदी प्रमुख उपस्थित होते.
दुपारी दोनच्या सुमारास हा मोर्चा सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशेजारी आला़ या ठिकाणी भाजप सरकार, कामगारमंत्री आणि सहायक कामगार आयुक्त सुहास कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़
दरम्यान, नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कदम यांना निवेदन दिले. नोंदीत कामगारांना तीन हजार अनुदान आणि तत्काळ सेवा पुस्तके का दिली नाहीत, असा जाब आडम यांनी कदम यांना विचारला. आंदोलनकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहून कदम यांनी अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे नूतनीकरण सेवापुस्तके देण्यासाठी विलंब झाल्याचे मान्य केले़ तसेच ३० सप्टेंबर २०१४ पूर्वी नोंदणीसाठी अर्ज केलेल्या कामगारांना १५ दिवसांत सेवापुस्तके देण्याचे आणि पडताळणी झालेल्या १२०० कामगारांना तीन हजार रुपये देण्याची प्रक्रिया पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले़ पण, २०१२ मध्ये नोंदीत झालेल्या ८०७२ कामगारांनाही तीन हजार रुपये दिवाळी भेट देण्याबाबत आडम यांनी आश्वासनाची मागणी केली़ कदम यांनी याप्रकरणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नियमावलीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. त्यावर धर्मा कांबळे यांनी तुम्ही कामगारांच्या बाजूचे की सत्ताधाऱ्यांचे, असा सवाल कदम यांना विचारला़ दरम्यान, आडम यांनी कामगार आयुक्त एच़ के़ जावळे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला़ यावेळी जावळे यांनी या ८०७२ कामगारांच्या तीन हजार रुपये अनुदानासंदर्भात पंधरा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळ परतले़
यानंतर नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा घेण्यात आली़ आडम म्हणाले, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली कामगारांची पिळवणूक करणारे, काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देणारे मोदी आणि भाजप हे लबाड कोल्हे आहेत, अशी टीकाही केली़ बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनस द्यावा, अपघात झाल्यास दहा लाख आणि मरण पावल्यास पाच लाख रुपये देण्यात यावेत, घरबांधणीसाठी पाच लाख रुपये अनुदान व दहा लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज द्यावे, वयाची साठी पूर्ण केलेल्या व ५५ वर्षांवरील नोंदीत कामगारांना एक लाख रुपये सन्मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांही आडम यांनी केल्या़
या विराट मोर्चामुळे व्यापारी पेठ परिसरातील व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली़ प्रचंड गर्दीमुळे कार्यालयाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़