थेट पाईपलाईनचे काम रोखले

By Admin | Updated: January 13, 2016 01:24 IST2016-01-13T01:19:13+5:302016-01-13T01:24:35+5:30

ठिकपुर्लीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : शेतकऱ्यांना भरपाई द्या, ४४ गावांना पिण्याचे पाणी देण्याची मागणी

Stop the work of direct pipeline | थेट पाईपलाईनचे काम रोखले

थेट पाईपलाईनचे काम रोखले

राशिवडे : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे सुरू असलेले थेट पाईपलाईनचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी बंद पाडले. राधानगरी तालुक्यातील धरणग्रस्तांचे पुर्नवसन, चर खुदाई करताना पडणारा भराव यांमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, तर थेट पाईपलाईनला गळती लागल्यास शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? ‘थेब थेंब पाण्यासाठी रक्ताचे पाट वाहू’, ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत दिडशेवर कार्यकर्त्यांनी थेट पाईपलाईनचे काम मंगळवारी दुपारी चार वाजता बंद पाडले.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जालंदर पाटील, पंचायत समिती सदस्य अजित पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जनार्दन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, शहराला शुद्ध पाणी पुरविण्याच्या विरोधात आम्ही नाही मात्र एकीकडे शहराला शुद्ध पाणी आणि खेड्यांना मैला, मळी मिश्रित पाणी का प्यायचे? ज्यांनी आपले संसार धरणात बुडविले त्यांचे पुर्नवसन अद्यापही झालेले नाही. त्यांच्यावर पुर्नवसनाचे भिजत घोंगडे शासन दरबारी असताना पुन्हा पाईपलाईनच्या चर खुदाईच्या कामामुळे पंधरा फूट उंच भरावा पडत आहे. शेतकऱ्यांनी आपली पिके रस्त्यावर आणायची कशी? पाईपलाईनला गळती लागून शेतकऱ्यांची जमीन नापिक होण्याची शक्यता आहे. त्याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित केले. अजित पोवार म्हणाले, राधानगरी पंचायत समितीने या थेट पाईपलाईन योजनेस विरोध करून ठराव महापालिकेकडे पाठविला होता. मात्र, या ठरावाला महानगरपालिकेने केराची टोपली दाखविली. राधानगरी तालुक्यांनी २६ गावे व करवीर तालुक्यांतील १८ गावांतून ही थेट पाईपलाईन जाणार असून, या गावांनाही या योजनेतून पिण्याचे पाणी मिळावे. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. ज्यांच्या पाईप फुटलेल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीला महापालिकेने कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. यावेळी जनार्दन पाटील वासुदेव पाटील यांची भाषणे झाली.
या अंदोलनात भीमराव गोणुगडे, राधानगरी तालुका अध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुका अध्यक्ष,
डॉ. बाळासाहेब पाटील, भुदरगड तालुका अध्यक्ष नितीन पोवार, शारदा कोईगडे, आण्णाप्पा चौगले, शरद मुसळे, तानाजी पाटील, शंकर पाटील, आण्णा खेबुडकर, शंकर पाटील, नीलेश महडेश्वर, आनंदा गारे, शिवाजी पाटील, शंकर कांबळे, शामराव टेपुगडे, डी. जी. चौगले, राजेंद्र पाटील, शंकर जाधव, विश्वास पाटील, सात्ताप्पा पाटील, संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याची तीव्रता पाहून ठेकेदारांनी तत्काळ काम बंद करून, यंत्र सामुग्रीसह वाहणे अन्यत्र हलविली. न्याय मिळेपर्यंत काम सुरू करू नय,े अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the work of direct pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.