मधाळेंच्या न्यायासाठी ‘रिपाइं’तर्फे रास्ता रोको

By Admin | Updated: September 5, 2015 00:13 IST2015-09-05T00:13:50+5:302015-09-05T00:13:50+5:30

संस्थेचे मानद सचिव चर्चेसाठी रस्त्यावर : आर्य समाज शिक्षण संस्थेसमोर कार्यकर्त्यांची निदर्शने

Stop the way through the 'RPI' for Madheen's judgment | मधाळेंच्या न्यायासाठी ‘रिपाइं’तर्फे रास्ता रोको

मधाळेंच्या न्यायासाठी ‘रिपाइं’तर्फे रास्ता रोको

कोल्हापूर : निवृत्त शिक्षक जयवंत मधाळे यांचा पेन्शन प्रस्ताव वरिष्ठ वेतनश्रेणीसह मुंबईतील महालेखाकार कार्यालयाकडे पाठवावा, या मागणीसाठी तसेच हक्कांसाठी लढणाऱ्या मधाळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (ए) शुक्रवारी लक्ष्मीपुरीतील आर्य समाज शिक्षण संस्थेच्या दारात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने केली.
आर्य समाज एज्युकेशन सोसायटीच्या बा. कृ. पाटील-कौलवकर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक मधाळे यांचा गेल्या तीन वर्षांपासून पेन्शन, सेवापुस्तक व अन्य लाभांसाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘रिपाइं’ने हे आंदोलन केले. ‘रिपाइं’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी सव्वाबाराला आंदोलनकर्ते आर्य समाज शिक्षण संस्थेच्या दारात दाखल झाले. त्यांनी ‘मधाळे सरांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘न्याय नाकारणाऱ्या संस्थेचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत रास्ता रोको केला. शिवाय चर्चेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर येण्यास भाग पाडले.
संस्थेचे मानद सचिव अनिरुद्ध पाटील येताच आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. मानद सचिव पाटील यांना चर्चेसाठी रस्त्यावर बसविले. यावेळी मधाळे यांच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेबाबत चर्चा झाली. प्रा. कांबळे यांनी मधाळे यांचा पेन्शन प्रस्ताव वरिष्ठ वेतनश्रेणीसह महालेखाकार कार्यालयात पाठवावा, अशी मागणी केली. त्यावर मानद सचिव पाटील यांनी पेन्शन प्रस्तावाची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर केली असून, मधाळे यांच्याबाबत सकारात्मक सहकार्याची भूमिका राहील, असे सांगितले. यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
आंदोलनात ‘आरपीआय’चे जिल्हा सरचिटणीस विलास भामटेकर, शहरचे सरचिटणीस सुखदेव बुध्याळकर, एस. डी. कांबळे, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटिळे, रूपाताई वायदंडे, अविनाश अंबपकर, दिलीप कोथळीकर, रोहित मधाळे, योगेश शिर्के, शामप्रसाद कांबळे, मारुती गायकवाड, अशोक गायकवाड, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Stop the way through the 'RPI' for Madheen's judgment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.