‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

By Admin | Updated: January 13, 2015 00:11 IST2015-01-12T23:54:33+5:302015-01-13T00:11:50+5:30

हेरवाडात शेतकरी आक्रमक : राजू शेट्टी यांच्या अटकेचा निषेध

Stop the way of 'Swabhimani' | ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको

कुरुंदवाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना पुणे येथे अटक केल्याच्या निषेधार्थ हेरवाड (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुपारी हेरवाड-कुरुंदवाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर झालेल्या या अचानक रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. या आंदोलनामुळे ‘स्वाभिमानी’ची ऊसदरासाठी यंदा आंदोलनाची पहिली ठिणगी पडली.एफआरपीप्रमाणे ऊसदर मिळावा या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, सोमवारी पुणे साखर आयुक्तालयावर मोर्चा होता. या आंदोलनाचा भडका उडाल्याने खासदार शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे समजताच हेरवाड येथील स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, पंचायत समिती सदस्या सुवर्णा अपराज, भूपाल चौगुले, कल्पना मस्के, रामचंद्र बरगाले, सुरेश पाटील, बाळू परीट, संजय अपराज यांच्यासह कार्यकर्त्यांनी दुपारी येथील चौकात जमून शासनाच्या विरोधात घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रवासी व वाहनधारकही गोंधळून गेले. सुमारे तासभर झालेल्या आंदोलनाने हेरवाड, कुरुंदवाड व बोरगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको आंदोलन झाल्याचे समजताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजून घातल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जयघोषाची घोषणा देत गावातून फेरी काढत गाव बंद करण्यात आले. त्यामुळे गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती. (वार्ताहर)


दानोळी बंद
दानोळी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी दुपारपासून दानोळीत बंद पाळण्यात आला. पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर उसाच्या एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी झालेल्या गदारोळामुळे खा. शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याच्या निषेधार्थ दानोळीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदचे आवाहन केले. दुपारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. अटकेच्या निषेधार्थ येथील शिवाजी महाराज चौकात निषेधाचा फलक लावण्यात आला आहे. दरम्यान, एसटी आगाराकडून जयसिंगपूरमार्गे दानोळी व नांदणी मार्गावरील सर्व एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले.



पूर्वीचा उत्साह नाही
खासदार राजू शेट्टी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ हेरवाड येथील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात हातावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते असल्याने पूर्वीचा उत्साह नसल्यामुळे स्वाभिमानीची हवा कमी झाल्याची चर्चा गावामध्ये होती.

Web Title: Stop the way of 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.