कोल्हापूर : प्राधिकरण हे लोकांच्या सोयीसाठी आहे. परंतु जनतेची कामे करताना वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करा. कोणी अधिकारी निवृत्त झाला असला तरी पेन्शन थांबवा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिल्या.शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांच्या गृहप्रकल्पाबाबत चर्चा करताना पत्रकारांनीच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामाची जनविरोधी कार्यपद्धती आबिटकर यांच्यासमोर मांडली. यावेळी त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. तर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्राधिकरण बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या.बैठकीत आबिटकर म्हणाले, कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणात येणाऱ्या ४२ गावांचा विकास आराखडा तयार करताना तो कोल्हापूर शहराशी सुसंगत असेल, याची काळजी घ्यावी. त्यासाठी नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणांच्या विकास आराखड्यांचा सविस्तर अभ्यास करा. या बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते.आबिटकर म्हणाले, आराखड्यामध्ये रस्ते, उद्याने, आरोग्य सुविधा, शाळा, रिंग रोड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यांचा प्राधान्याने समावेश करावा. तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी. शासनाच्या नियमांनुसार प्राधिकरणाची समिती गठित करावी. विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी.प्राधिकरणाचे काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासन स्तरावरील रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवावी. आमदार नरके आणि आमदार महाडिक यांनीही यावेळी सूचना केल्या. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी यावेळी विकास आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले.
कोल्हापूर प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवा, पालकमंत्र्यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 13:53 IST