शेतीमाल नियमनाबाबतचा पोरखेळ थांबवा : शेट्टी
By Admin | Updated: July 2, 2016 00:57 IST2016-07-02T00:51:22+5:302016-07-02T00:57:31+5:30
सरकारला सल्ला : समर्थनासाठी सोमवारी तहसीलदारांना निवेदन

शेतीमाल नियमनाबाबतचा पोरखेळ थांबवा : शेट्टी
कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्त करण्याचा अध्यादेश काढला; पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने समिती नेमून पोरखेळ सुरू केला असून, तो थांबवावा. सरकारने गुळमुळीतपणा सोडून आपण शेतकऱ्यांच्या की व्यापाऱ्यांच्या बाजूने आहोत, ही भूमिका एकदा स्पष्ट करावी, असा सल्ला देत व्यापाऱ्यांच्या आडून कॉँग्रेस, राष्ट्रवादी नियमनाबाबत सरकारवर दबाव टाकत आहे. हे हाणून पाडत शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घ्याल तर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
सगळा शेतीमाल नियमनमुक्त करा,अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे; पण आघाडी सरकारच्या काळात आश्वासनापलीकडे काहीच पदरात पडले नाही. महायुतीच्या सरकारने फळे व भाजीपाला नियमनमुक्तीचा अध्यादेश काढला, पण विचारविनिमय करण्यासाठी समितीची नेमणूक केली. सरकारने हा पोरखेळ थांबवावा, व्यापाऱ्यांनी खुशाल संप करावा. सरकारने त्यांचे परवाने रद्द करावेत. व्यापाऱ्यांसह माथाडी कामगार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. अनेक बेरोजगार हे काम करण्यास तयार असल्याने अशी बांडगुळे किती दिवस सांभाळायची? असा सवाल शेट्टी यांनी केला.
ऊस झोनबंदीबाबतही न्यायालयाने सरकारला फटकारले होते. हा शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे. तो त्याच्या जोखमीवर विकत असेल तर त्याला मोकळीक दिली पाहिजे. आमचा माल बांधावर विकू अथवा बाजारात नेऊन; त्यासाठीचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. समिती नेमली असली तरी आम्ही सरकारकडून निर्णय वदवून घेऊ. नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या शाळा, दवाखाने असताना खासगींंना परवानगी देता; मग खासगी विक्रीला विरोध का? ४ जुलैला व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. त्याला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियमनमुक्तीबाबत निवेदन देणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. आमदार सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील, भगवान काटे, उपस्थित होते.
‘एफआरपी’ बुडविणाऱ्यांशी मैत्री कसली
जो शेतकऱ्यांचा विरोधक तो आमचा, शेतकऱ्यांच्या घामाच्या एफआरपीचे पैसे बुडविणाऱ्यांशी कसली मैत्री करायची? उलट अशा कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी आमचा सरकारवर दबाव असल्याचा टोला खासदार राजू शेट्टी यांनी विनय कोरे यांना हाणला. सरकारच्या कामकाजाबाबत ज्या दिवशी जनतेमधून नाराजी व्यक्त होईल, त्यादिवशी आम्ही जनतेबरोबर राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेट्टी-कोरे मैत्रीबाबत पत्रकारांनी छेडले असता, शेट्टी म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी इंजोळ (ता. पन्हाळा) येथील कार्यक्रमात आम्ही दोघे एकत्र होतो. ‘आम्ही एकत्र आलो’, असे म्हणणे चुकीचे असून ‘वारणा’ कारखान्याने एफआरपी दिलेली नाही अशांबरोबर मैत्री कसली करता. राज्यात ४२६ कोटींची एफआरपी थकीत असून पश्चिम महाराष्ट्रात संघटनेच्या दबावामुळे बहुतांशी कारखान्यांनी पैसे दिले आहे. शिवसेना-भाजपमधील भांडणाबाबत विचारले असता, यामध्ये आम्हाला पडायचे नाही. आघाडी सरकारपेक्षा महायुतीचे काम चांगले आहे. आधीचे सरकारच बरे असे ज्यादिवशी जनतेला वाटेल त्यावेळी आम्ही जनतेसोबत राहू, असे शेट्टी यांनी सांगितले. राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत, दोन्ही ठिकाणच्या सत्तांतरामध्ये आमची भूमिका महत्त्वाची होती. मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्र्यांकडून विचारणा झाल्यानंतर बोलणे उचित होईल, असे शेट्टी यांनी सांगितले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटाबद्दल विचारले असता, सतत शेतकऱ्यांच्यामध्ये असल्याने आम्हाला नाथाभाऊंचे काही कळत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.