भटक्या विमुक्त समाजातर्फे रास्ता रोको
By Admin | Updated: April 1, 2015 00:33 IST2015-04-01T00:33:40+5:302015-04-01T00:33:51+5:30
विविध मागण्यांकडे लक्ष : शासनाच्या विरोधात घोषणा, वाहतूक खोंळबली

भटक्या विमुक्त समाजातर्फे रास्ता रोको
कोल्हापूर : भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भटका समाज मुक्ती आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी माने, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यशवंतराव चव्हाण योजनेतील तरतुदीनुसार वर्षाला २० कुटुंबांच्या तीन वसाहती करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे चार वर्षांत १२ वसाहती निर्माण केल्या असत्या तर २४० कुटुंबांना हक्काची घरे मिळाली असती. मात्र, समाजकल्याण आणि जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे योजनेची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी अनेक गरीब भटक्या कुटुंबांना घरापासून वंचित राहावे लागले. त्याला समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी माने, समितीचे सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त गायकवाड जबाबदार आहेत.
पारगांव (ता. हातकणंगले) येथील गोपाळ समाजातील गोपाळ समाजातील काही कुटुंबे घरासाठी पात्र आहेत. त्यांना त्वरीत जागा व घरे द्यावीत. टोप येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाजवळ गंगाराम नगर येथे कोणत्याही मूलभूत सुविधा नसलेल्या जागेत गोपाळ समाजातील २३ कुटुंंबे राहतात. या कुटुंबांना घरे मिळावीत यासाठी प्रस्ताव दिले आहेत. मात्र, ते प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.
जाचक अट शिथील करून दाखले द्यावेत.
निगवे दुमाला (ता. करवीर) येथे गोपाळ समाजाची ३२ कुटुंबे राहतात. शिरोली पुलाची येथील भूमीहिन २० कुटुंबे राहतात. वसगडे येथे गोपाळ, नंदीवाले समाजातील कुटुंबे आहेत. त्यातील प्रत्येक कुटुंबांला घरे द्यावीत. नागावातील गोपाळ समाजालाही जागा द्यावी आदी मागण्यांंकडे लक्ष वेधण्यासाठी येथील दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला. त्यावेळी संतप्त कार्यकर्ते प्रवेशद्वार ढकलून आवारात घुसण्याचा प्रयत्न केले. पोलिसांनी थोपवून ठेवले. जोरदार निदर्शने करत रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी रस्त्यांनी वाहतूक वळविली. निवासी जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव साठे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. रमेश चांदणे, भारत धोंगडे, विकास कांबळे, आदिनाथ साठे, युवराज पोवार आदी मोर्चात सहभागी झाले होते.
चौक दुमदुमला
‘निम का पत्ता कडवा हैं, सरकार साला भडवा हैं’, ‘एक रुपयाला कडिपत्ता, सरकार झाले बेपत्ता’, ‘निष्क्रिय राजाराम माने यांनी राजीनामा द्यावा’, ‘गलथान कारभार करणारे जिल्हा महसूल यंत्रणेचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.