१० आॅगस्टला पेट्रोल पंप बंद
By Admin | Updated: August 2, 2015 01:16 IST2015-08-02T01:16:11+5:302015-08-02T01:16:11+5:30
एलबीटीचा तिढा : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पेट्रोल, डिझेल असोसिएशनचा निर्णय

१० आॅगस्टला पेट्रोल पंप बंद
कोल्हापूर : राज्य सरकारने एलबीटी अंशत: माफ केला असल्याने यातून पेट्रोल पंप मालकांना वगळावे, या मागणीसाठी १० आॅगस्टला एक दिवस सामुदायिक सुटी घेत शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पेट्रोल, डिझेल असोसिएशनने घेतला आहे. जर पेट्रोलियम कंपन्यांनी ही मागणी मान्य केली नाही, तर ११ आॅगस्टनंतर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच पेट्रोल पंप सुरू ठेवले जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
ज्या व्यापारी कंपन्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींपेक्षा कमी आहे, अशा कंपन्यांना एलबीटी माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली. या निर्णयामुळे कोल्हापुरातील केवळ १७ व्यापारी-उद्योजक वगळता अठरा हजारांहून अधिक व्यापारी, उद्योजकांची त्यातून सुटका झाली आहे; परंतु शहरातील पेट्रोलपंप मालक मात्र यात अडकले आहेत.
शहरात सध्या २७ पेट्रोलपंप असून, त्यातील तीन बंद आहेत. या पेट्रोलपंप मालकांची वार्षिक उलाढाल साधारणपणे ८ ते ९ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे एलबीटीमधून आम्हाला वगळावे, अशी त्यांची मागणी आहे.
शनिवारी या तिन्ही कंपन्यांशी संपर्क साधून यापुढे एलबीटीची रक्कम भरून घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली. परंतु, कंपन्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
...तर पेट्रोल, डिझेल स्वस्त
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पेट्रोल, डिझेल असोसिएशनने केलेल्या मागणीनुसार पेट्रोलियम कंपन्यांनी जर वैयक्तिक उलाढाल पाहून एलबीटी घेण्याचे बंद केले, तर त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल.
पेट्रोल व डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होणार आहे. शहर आणि ग्रामीण भागांत त्यांचे दर एकसारखे होतील. (प्रतिनिधी)