हेरवाड येथे ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
By Admin | Updated: January 13, 2015 00:48 IST2015-01-13T00:48:03+5:302015-01-13T00:48:41+5:30
शेट्टी यांच्या अटकेचा निषेध : वाहतुकीची कोंडी; दानोळीत बंद

हेरवाड येथे ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
कुरुंदवाड : खासदार राजू शेट्टी यांना पुणे येथे अटक केल्याच्या निषेधार्थ हेरवाड (ता. शिरोळ) येथील ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दुपारी हेरवाड-कुरुंदवाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर झालेल्या या अचानक रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली. दानोळी येथेही बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे ‘स्वाभिमानी’ची ऊसदरासाठी यंदा आंदोलनाची पहिली ठिणगी पडली.एफआरपीप्रमाणे ऊसदर मिळावा या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, सोमवारी पुणे साखर आयुक्तालयावर मोर्चा होता.
तीन महिन्यांत सरकार शेतकरी विरोधी !
पुण्यात साखर संकुलात तोडफोड केल्याप्रकरणी संघटनेचे नेते राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांना अटक करण्यात आली. त्यावर ‘शेतकरी विरोधी सरकारचा जाहीर निषेध’ असे मेसेज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोशल मीडियावर फिरत होते. शेट्टी यांचा पक्ष ज्या सरकारमध्ये घटक पक्ष आहे. त्याच पक्षाने अवघ्या तीन महिन्यांत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे जाहीर केल्याने हे सरकार नक्की कुणाचे आहे, याचीही चर्चा सुरू झाली आहे.