पाटणे फाटा येथे रास्ता रोको
By Admin | Updated: July 31, 2014 00:46 IST2014-07-31T00:44:48+5:302014-07-31T00:46:25+5:30
कर्नाटकी पोलिसांचा निषेध : संकेश्वरमधून कोल्हापूर बससेवा बंद

पाटणे फाटा येथे रास्ता रोको
चंदगड : येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील निष्पाप नागरिकांवर कर्नाटकी पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आज, बुधवारी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावर चंदगड तालुका युवक काँगे्रसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
येळ्ळूर येथे गावाच्या वेशीवर ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ असा फलक आहे. हा फलक कर्नाटक पोलिसांनी काढताना येळ्ळूरवासीयांनी विरोध दर्शविला म्हणून त्यांना घरात घुसून अमानुषपणे मारहाण केली आहे. ही कृती म्हणजे हुकूमशाही असून, कर्नाटक पोलिसांचा तीव्र शब्दांत पं. स.चे सदस्य शांताराम पाटील यांनी निषेध केला.
आंदोलनात नामदेव कांबळे, यशवंत सोनार, तुकाराम बेनके, बंडू चव्हाण, उपसभापती बबन देसाई, दशरथ पाटील, निंगू गुरव, रवी बांदिवडेकर, दत्ता देशमुख, एन. डी. पाटील, टी. के. पाटील, आदींसह नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)