सांडपाणी नदीत सोडणे थांबवा
By Admin | Updated: July 18, 2014 00:51 IST2014-07-18T00:45:19+5:302014-07-18T00:51:28+5:30
गडहिंग्लजमध्ये विरोधी आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन

सांडपाणी नदीत सोडणे थांबवा
गडहिंग्लज : शहरातील सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले असून, सांडपाणी नदीत सोडणे त्वरित थांबवा, अन्यथा जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून दाद मागण्यात येईल, असा इशारा विरोधी आघाडीतर्फे नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे., बुधवारी (दि. १६) उपनगराध्यक्षा तथा
आरोग्य व पाणीपुरवठा समिती सभापती कावेरी चौगुले यांच्यासमवेत नगराध्यक्षा व इतर पदाधिकाऱ्यांनी सांडपाणी बंधाऱ्याची पाहणी करून गाळ उपसण्याचे व पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे सांडपाणी नदीत सोडल्याचे
समजते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
शिष्ठमंडळात विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, बांधकाम समिती सभापती नरेंद्र भद्रापूर, न.पा. शिक्षण मंडळ उपसभापती रियाज जमादार, नगरसेवक दादू पाटील, राजेश बोरगावे, बाळासाहेब वडर, नितीन देसाई, बसवराज खणगावे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)