महाविद्यालयांचा जातीय कारभार थांबवा

By Admin | Updated: January 14, 2016 00:23 IST2016-01-14T00:23:17+5:302016-01-14T00:23:17+5:30

आंबेडकरी संघटनांचे जनआंदोलन : मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

Stop the administration of colleges | महाविद्यालयांचा जातीय कारभार थांबवा

महाविद्यालयांचा जातीय कारभार थांबवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचारी यांचे विविध गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्यावरील अन्याय आणि या महाविद्यालयांमधील जातीय कारभार थांबवा, अशी मागणी विविध आंबेडकरी समाज, पक्ष, संघटना व जनआंदोलनाच्या शिष्टमंडळाने बुधवारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केली.
यावेळी शिष्टमंडळाने दोन तास १९ मागण्यांबाबत डॉ. शिंदे यांच्याशी चर्चा केली. मागण्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाने एका महिन्यात कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
जनआंदोलनाचे शिष्टमंडळ व कुलगुरू डॉ. शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्यातील चर्चा दुपारी तीनच्या सुमारास सुरू झाली. यात प्रारंभी शिष्टमंडळातर्फे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (ए) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. शिंदे यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (जी) चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख, विजय काळेबाग, आदी उपस्थित होते. यानंतर प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, काही महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालकांकडून मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचारी यांना विविध स्वरूपातील त्रास दिला जात आहे. संंबंधित अन्याय व जातीय कारभार थांबविण्यासाठी विद्यापीठाने अधिसत्तेने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी. प्रा. देशमुख म्हणाले, मागासवर्गीय प्राध्यापक, कर्मचाऱ्यांवरील अन्याय होणे हे गंभीर आहे. याबाबतच्या तक्रारींबाबत लक्ष देऊन संबंधितांना न्याय देण्याचे काम विद्यापीठाने लवकर करावे. बैठकीत विविध १९ मागण्यांनिहाय चर्चा करण्यात आली. यातील काही मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही दिली. शिवाय मागण्यांच्या अनुषंगाने विद्यापीठाकडून होणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली जाईल असे सांगितले. दरम्यान, मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. जनआंदोलनाने संबंधित मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत कार्यवाही न झाल्यास् तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे प्रा. शहाजी कांबळे यांनी सांगितले.
बैठकीस प्रा. राजरतन जाधव, विकास क्षीरसागर, जी. बी. अंबपकर, ब्लॅक पँथरचे सुभाष देसाई, लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, बहुजन रयत पार्टीचे दिलीप मोहिते, पिपल्स् रिपब्लिकन पार्टीचे सोमनाथ घोडेराव, समता प्रबोधिनीचे वसंत लिंगनूरकर, फास्टाचे जिल्हाध्यक्ष एम. ए. कांबळे, महिला अन्याय निवारण समितीच्या रूपाताई वायदंडे, निर्मलाताई धनवडे, स्वप्निल कांबळे, प्रताप नागवंशी, संभाजी कागलकर, जेलित कांबळे, सर्जेराव पदमाकर, बबन कांबळे, भीमराव कांबळे, आर. जी. कांबळे, सतीश राठोड, मधुकर धत्तुरे, डॉ. प्रविण कोडोलीकर उपस्थित होते.

Web Title: Stop the administration of colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.