‘एलबीटी’बाबतची कारवाई थांबवा
By Admin | Updated: December 9, 2014 23:52 IST2014-12-09T23:37:59+5:302014-12-09T23:52:19+5:30
मुख्यमंत्र्यांचे आदेश : राजेश क्षीरसागर यांचे साकडे

‘एलबीटी’बाबतची कारवाई थांबवा
कोल्हापूर : स्थानिक संस्था कराबाबत (एलबीटी) व्यापाऱ्यांवरील अन्यायी कारवाई थांबवावी शिवाय एलबीटीप्रश्नी अधिवेशनात प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ यांची तातडीने बैठक घ्यावी, या मागणीचे निवेदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यावर व्यापाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे होत असलेली कारवाई थांबवावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्गमित केले तसेच बैठकीबाबत तयारी दर्शविली.
सभागृह कामकाजाच्या सुरुवातीस आमदार क्षीरसागर यांनी एलबीटीप्रश्नी पाँईट आॅफ इन्फरमेशन सादर केला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. एलबीटीविरोधात तत्कालीन सरकारशी चार वर्षे संघर्ष करत युती सरकारवर विश्वास ठेवत व्यापाऱ्यांनी उघडपणे भूमिका मांडली. एलबीटी रद्द करण्याबाबत शासन अनुकूल आहे. मात्र, महानगरपालिकांच्या उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निश्चित होणे गरजेचे असल्याचे शपथविधीनंतरच्या पहिल्या बैठकीमध्ये आपण स्पष्ट केले आहे. पण, त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा निघालेला नाही.
कारवाई विरोधात सांगलीमध्ये १५ डिसेंबरला व्यापाऱ्यांनी ‘आमरण उपोषण’ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे सरकार सहकार्य हवे असल्यास कोल्हापूर, सांगली, सोलापूरमधील व्यापाऱ्यांवरील कारवाई ताबडतोब थांबवावी. एलबीटीबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी निवेदनाद्वारे केली. (प्रतिनिधी)