आकसातूनच आरोप, दिशाभूल थांबवा!
By Admin | Updated: July 16, 2015 21:38 IST2015-07-16T21:38:11+5:302015-07-16T21:38:11+5:30
किरण कदम यांचे प्रत्युत्तर : विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही

आकसातूनच आरोप, दिशाभूल थांबवा!
गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराच्या विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही. आकसातूनच आमदार हसन मुश्रीफ व ‘राष्ट्रवादी’वर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक किरण कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.आठवड्यापूर्वी मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत पालिकेतील ‘सत्तांतरा’बाबत टीका-टिप्पणी केली होती. त्यास जनता दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले.
२००६-११ या कालावधीत स्वाती कोरी यांच्या आघाडीने किती चोख काम केले आहे, हे गडहिंग्लजकरांना माहीत आहे. त्याचे उत्तर म्हणूनच जनतेने ‘राष्ट्रवादी’कडे सत्ता दिली. म्हणूनच मुश्रीफ यांनी शहरासाठी १०० कोटी निधी देण्याचा संकल्प केला. त्याच्या पूर्ततेची धमक त्यांच्यात आहे.गतवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी नसतानाही साडेतीन कोटींची कामे ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीने केली होती. तो पहिल्या वर्षातच भरून काढला. त्यांनी अर्धवट सोडलेली सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण केली. लक्ष्मी यात्रेत शहरातील ९० टक्के रस्ते डांबरी केले.
तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ५ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर झाला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी ६४ लाख शिल्लक असताना १ कोटी ६३ लाख शिल्लक असल्याचा खोटा आरोप झाला आहे. १० कोटींचा बहुउद्देशीय हॉलचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे तयार आहे, तसेच योग विद्याधामचा एक कोटीचा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी पाठविला आहे.
राष्ट्रवादीने सुंदराबाई बिलावरांना दोनवेळा नगरसेवक व उपनगराध्यक्षपदी बसविले. ‘लक्ष्मी’ दर्शनातूनच त्या विरोधकांना सामील झाल्या असतानाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे कोरी सांगत आहेत. बिलावरांनी त्यांना वटमुखत्यारपत्र दिले आहे का? असा सवालही कदम यांनी केला. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘चौकशी’ला सामोरे जाण्यास तयार
घनकचरा प्रकल्पासाठी ४३ लाखांची
मशिनरी रीतसर मंजुरीनेच बसविली आहे. तरीदेखील विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. सहा महिने वीजकनेक्शन अभावी व त्यानंतर पावसाळ्यामुळे मशिनरी बंद आहे. कचऱ्यावर प्रक्रियेचा हा राज्यातील पहिला यशस्वी प्रकल्प आहे. त्याबाबतच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
‘मीटर’चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न
२०१० मध्ये नागरिकांनी स्व:खर्चाने नळांना मीटर बसवून घ्यावीत अशी सूचना कोरी यांनीच पालिकेच्या सभेत केली होती. आम्ही सत्तेवर आल्यानंतर मीटर मोफत बसविण्याचा ठराव केला, त्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून एक कोटीहून अधिक रक्कम ठेवली आहे. मात्र, मोफत मीटरची घोषणा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत, असा आरोप कदम यांनी केला.