महापौर माळवींच्या घरावर दगडफेक
By Admin | Updated: March 6, 2015 01:19 IST2015-03-06T01:12:27+5:302015-03-06T01:19:02+5:30
खिडक्यांच्या काचा फोडल्या : मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींकडून कृत्य; पोलिसांत गुन्हा

महापौर माळवींच्या घरावर दगडफेक
कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी मध्यरात्री दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांची काचेची तावदाने फुटली आहेत. राजारामपुरी पाचव्या गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी माळवी यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी (दि. ३) महानगरपालिकेतून घरी जात असताना महापौर माळवी यांची गाडी अडवून नगरसेवकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी ३६ नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री अचानक काही अज्ञात व्यक्तींनी माळवी यांच्या घरावर दगडफेक केली. महापौरांच्या राजीनामा नाट्याला हिंसक वळण लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर माळवी यांचा राजारामपुरी पाचव्या गल्लीत आनंदी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्या दोन मुले व सासू शकुंतला माळवी यांच्यासोबत राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या आई पद्मा अथणे याही माळवी यांच्या घरी राहायला आल्या आहेत. बुधवारी रात्री या तिघी व दोन मुले झोपी गेली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक घरावर दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. अज्ञातांनी मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघराच्या दिशेनेही दगडफेक केली.
दगडफेकीमुळे पहिल्या खोलीत झोपलेल्या शकुंतला, पद्मा व आतील खोलीत असलेल्या महापौर माळवी घाबरल्या. त्यांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यांनी तत्काळ राजारामपुरी पोलीस ठाण्याला फोन केला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस पाच-सहा मिनिटांतच पोहोचले. त्यानंतरच दरवाजा उघडला. पोलीस येण्यापूर्वीच हल्लेखोरांनी पलायन केले. गस्तीच्या पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला; पण ते सापडले नाहीत. पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली.
पहाटे तीन वाजता महापौर माळवी या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गेल्या; पण आपण घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सकाळी येऊन फिर्याद देते, असे सांगून त्या निघून गेल्या. गुरुवारी सकाळी त्या अकरा वाजता पोलीस ठाण्यात गेल्या. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी चर्चा करून त्यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरुद्ध भा. दं. वि. स. कलम ३३६ व ४२५ नुसार गुन्हा नोंद केला आहे.