सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत अजून लाॅकडाऊनच- व्याख्यानमाला, स्पर्धा, नाटक, नृत्य, महोत्सवांना ब्रेक : कार्यक्रमांविना सरले वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:39 IST2020-12-13T04:39:18+5:302020-12-13T04:39:18+5:30
कोल्हापूरला कला-संस्कृतीची परंपरा लाभल्याने येथे वर्षभर कलेचा जागर होतो. कलावंतांना व्यासपीठ मिळते. रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद मिळतो. मात्र, यंदा ...

सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत अजून लाॅकडाऊनच- व्याख्यानमाला, स्पर्धा, नाटक, नृत्य, महोत्सवांना ब्रेक : कार्यक्रमांविना सरले वर्ष
कोल्हापूरला कला-संस्कृतीची परंपरा लाभल्याने येथे वर्षभर कलेचा जागर होतो. कलावंतांना व्यासपीठ मिळते. रसिकांना दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद मिळतो. मात्र, यंदा मार्च महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सांस्कृतिक चळवळी थांबल्या. आता जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी कला क्षेत्र दैनंदिन गरजेच्या किंवा जीवनावश्यक गोष्टींमध्ये येत नसल्याने अजूनही या क्षेत्रात अघोषित लॉकडाऊनच सुरू आहे.
सांस्कृतिक मेजवानी नाहीच
गायन समाज देवल क्लबमध्ये दर आठवड्याला गायन-वादन-नृत्याचे कार्यक्रम सादर होतात. भालजी पेंढारकर केंद्र, संस्कारभारती, करवीर नगर वाचन मंदिर, गुणीदास फौंडेशन, अंतरंग या सांस्कृतिक संस्थांसह कोल्हापुरात अनेक लहान मोठ्या संस्था व व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गायन, वादन, नृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. उन्हाळ्यात शिबिर मोठ्या प्रमाणात होतात. मात्र, एरव्ही बुकिंग न मिळणारे केशवराव नाट्यगृह आणि शाहू स्मारक भवन रिकामे आहे.
विचारांचा जागर थांबला
पुरोगामी विचारांचा जागर करीत शहरात चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा मोठ्या प्रमाणात होत. अवि पानसरे व्याख्यानमाला, तात्यासाहेब तेंडुलकर व्याख्यानमाला, वि. स. खांडेकर व्याख्यानमाला, दिगंबर जैन बोर्डिंग, महापालिकेच्यावतीने दरवर्षी व्याख्यानचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विचारांचा जागर होतो, जो आता काहीअंशी व्हर्चूअल होत असल्याने तो सर्वांपर्यंत पोहोचत नाही.
चित्र-शिल्पकलेचा कॅनव्हास सुना
दरबारी चित्रकार आबालाल रेहमान यांच्यापासून कोल्हापुरात चित्र-शिल्पकलेची परंपरा आहे. डिजिटायझेशन, ॲनिमेशन या करिअरच्या नव्या वाटांमुळे कलामहाविद्यालयांमध्ये वेटिंग लिस्ट लागते. व्यावसायिक कलाकारांपासून ते हौशी कलेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही संख्या तीन हजारांवर आहे. त्यामुळे वर्षभर शाहू स्मारक भवनचे कलादालन कायम बुक असते. आता मात्र गेली आठ महिने हे कलादालन आणि कॅनव्हासही सुनासुना आहे.
महोत्सवांना ब्रेक
महिलांसाठी झिम्मा-फुगडी स्पर्धांसह कलागुण सादर करण्याची संधी, चित्रपट महोत्सव, गृहिणी-भगिनी महोत्सव, महिला मंडळांचे कार्यक्रम, ताराराणी महोत्सव, कलामहोत्सव, कृषी महाेत्सव, गौरी-गणपतीत पारंपरिक खेळ, नवरात्रौत्सवात गरबा-दांडिया अशा विविध महोत्सवांनी कोल्हापूर कायम फुललेले असते. मनसोक्त खरेदी आणि खाद्यपदार्थांवर ताव ही या महोत्सवांची खासियत. त्यामुळे महिलांसह अनेकांच्या हाताला काम मिळते. या महोत्सवांनाही यंदा ब्रेक लागला आहे.
---