पट्टणकोडोली, हुपरी, कागलमध्ये कडकडीत बंद
By Admin | Updated: November 9, 2014 00:49 IST2014-11-09T00:49:47+5:302014-11-09T00:49:47+5:30
आक्षेपार्ह मजकूर प्रकरण : दोषींवर कारवाईची मागणी

पट्टणकोडोली, हुपरी, कागलमध्ये कडकडीत बंद
कागल/पट्टणकोडोली : सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्र अपलोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), कागल, हुपरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी दोषी समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बंद काळात वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कबनूर येथे रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी एसटीवर दगडफेक केली.
पट्टणकोडोलीत दोषी समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी करीत आज, शनिवारी गाव बंदची हाक देण्यात आली होती. गावातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. बंद काळात तणावपूर्ण वातावरण बनल्याने पोलीस बंदोबस्त कायम असून सायंकाळी व्यवहार सुरळीत चालू झाले.
दरम्यान, सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने एस. टी. बसेसची वाहतूकही बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे हाल झाले. काहींनी वडापचा आधार घेतला, तर काहींनी चालत प्रवास केला.
कागल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियावर विटंबना झाल्याच्या निषेधार्थ येथील दलित कार्यकर्त्यांच्यावतीने आज, शनिवारी कागलमध्ये बंद पाळण्यात आला. सकाळी नेहमीप्रमाणे शहरातील सर्व व्यवहार सुरू होते. साडेनऊच्या सुमारास कार्यकर्ते डॉ. आंबेडकर चौकातून घोेषणा देत बाहेर पडले आणि त्यांनी बंदचे आवाहन केले. तासाभरात शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले.
शाळा, महाविद्यालये, विद्यालये. सोडण्यात आली. बसस्थानकावरील एस.टी. बसेस, केएमटी सेवाही रोखून धरण्यात आली. यामुळे विद्यार्थीवर्ग, नागरिक, प्रवासीवर्ग बसस्थानकात अडकून पडला होता. दुपारनंतर व्यवहार सुरू होऊ लागले.