काँग्रेससोबत रहा; ताकद देऊ
By Admin | Updated: December 22, 2015 00:51 IST2015-12-22T00:39:41+5:302015-12-22T00:51:38+5:30
रमेश बागवे : बजरंग देसाई, दीपक पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची सूचना

काँग्रेससोबत रहा; ताकद देऊ
कोल्हापूर : पक्षाविरोधात कोणतीही भूमिका घेऊ नका. तुमच्या अडचणी व प्रश्न निश्चितच समजून घेतले जातील. पक्षासोबत राहिल्यास तुम्हाला ताकद देऊ, असा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप पक्षनिरीक्षक रमेश बागवे व सत्यजित देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांना सोमवारी दिला. तसेच माजी आमदार बजरंग देसाई, ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील यांच्यासह अन्य नेत्यांशी चर्चा करून विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याची सूचना त्यांनी केली.
विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण तर दिवसेंदिवस तापत चालले आहे. कॉँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या आ. महादेवराव महाडिक यांच्यामुळे ही लढत चुरशीची झाली आहे. कॉँग्रेसचे काही पदाधिकारी उघडपणे महाडिक यांच्यासोबत दिसत आहेत. याची गंभीर दखल कॉँग्रेसच्या वरिष्ठांनी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत कॉँग्रेसची जागा जिंकायचीच, ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे कोणतीही ‘रिस्क’ घ्यायला पक्षश्रेष्ठी तयार नाहीत. त्यामुळे पक्षनिरीक्षक बागवे व प्रदेश सरचिटणीस देशमुख कोल्हापुरात दाखल झाले. यानंतर त्यांनी सकाळी आठच्या सुमारास माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांचे चिरंजीव व ‘गोकुळ’चे संचालक दीपक पाटील यांची नागाळा पार्क येथील जिल्हा परिषदेच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बागवे व देशमुख यांनी पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आम्ही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार येथे आलो असून, आपण पक्षविरोधात कोणतीही भूमिका घेऊ नये. पक्ष तुम्हाला ताकद देईल, असे सांगितले. तुमचे पक्षांतर्गत काही वाद असतील तर तेही सोडविले जातील; परंतु तुम्ही विरोधी भूमिका घेऊ नका. यावर दीपक पाटील यांनी आम्ही पक्षासोबतच असल्याची ग्वाही निरीक्षकांना दिली.
यानंतर निरीक्षकांनी बजरंग देसाई यांची कळंबा येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, तौफिक मुल्लाणी, संजय पोवार-वाईकर होेते. यावेळी देसाई यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी आपल्याकडून पक्षविरोधी कोणतेही काम होणार नसून, आपण पक्षासोबतच असल्याचे सांगितले. त्यानंतर कॉँग्रेसचे जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद शहाजी पाटील यांच्याशी निरीक्षकांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी पाटील यांनी आपण कॉँग्रेससोबतच असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोमवारी दुपारी सतेज पाटील यांनी माजी केंद्रीय कोळसा मंत्री प्रतीक पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर सतेज पाटील, प्रतीक पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची अजिंक्यतारा कार्यालयात निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. +
विधान परिषद निवडणूक : ‘व्हिप’ काढणार
कॉँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य रविवारी (दि. २७) एकत्रित पक्षनिरीक्षकांसोबत मतदानासाठी येतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. २४) पक्षनिरीक्षक पुन्हा कोल्हापुरात येऊन विधान परिषद निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. पक्षाच्या सर्व मतदारांना ‘व्हिप’ लागू करण्यात येणार आहे.