‘सर्किट बेंच’ला मंजुरी दिल्यास शहांचा पुतळा

By Admin | Updated: September 4, 2015 00:47 IST2015-09-04T00:47:10+5:302015-09-04T00:47:10+5:30

माणिक मुळीक यांचे प्रतिपादन महापालिकेतर्फे चबुतरा आणि पुतळ्यास जागा उपलब्ध करून देऊ : महापौर

The statue of the beam is approved by the circuit bench | ‘सर्किट बेंच’ला मंजुरी दिल्यास शहांचा पुतळा

‘सर्किट बेंच’ला मंजुरी दिल्यास शहांचा पुतळा

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोल्हापूरच्या ‘सर्किट बेंच’च्या मागणीस येत्या दोन-तीन दिवसांत न्याय मिळणार असून, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूरला बेंच मंजूर केल्यास त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आम्ही त्यांचा पुतळा उभा करू, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माणिक मुळीक यांनी केले. ते शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ज्येष्ठ विधिज्ञांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.
मुळीक म्हणाले, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे मंगळवारी (दि. ८) निवृत्त होत आहेत. त्यांची गोवा येथे खंडपीठ कृती समितीने भेट घेतली. यावेळी शहा यांनी कोल्हापुरात संस्थानकाळात हायकोर्ट होते, याचे पुरावे सादर करा. मी त्यातील सत्यता पडताळून तत्काळ याबाबत सकारात्मक निर्णय घेतो. माझ्या या निर्णयाचा लाभ कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील पक्षकारांना सोयीचा ठरणारा असेल तर लवकरच याबाबत ठोस निर्णय घेऊ, असा शब्द दिला आहे.
त्यामुळे लवकरच कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे. मागणी पूर्ण होताच कोल्हापुरात आम्ही त्यांचा पुतळा उभा करू. कारण ज्यांनी-ज्यांनी कोल्हापूरसाठी मोठे काम केले, त्या व्यक्तींचे पुतळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे केले आहेत. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शहा यांचाही पुतळा उभा करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करू.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर वैशाली डकरे म्हणाल्या, माननीय न्यायमूर्ती शहा यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच दिले तर महानगरपालिकेतर्फे आम्हीही त्यांच्या पुतळ्यासाठी चबुतरा आणि जागा उपलब्ध करून देऊ.
ज्येष्ठ विधिज्ञ व माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच होणार म्हणून गेल्या दोन दिवसांत पुणे-मुंबईतील वकिलांनी उच्च न्यायालयातील कामे घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे कोल्हापूरला अंबाबाईच्या कृपेने मुख्य न्यायाधीश शहा यांच्याकडून सर्किट बेंचला मंजुरी मिळणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, जनआंदोलनाच्या रेट्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न सुटत आहे. यासाठी एल. एम. चव्हाण, अ‍ॅड. मुळीक यांच्यासह जनतेचे आभार मानायला हवेत. मुख्य न्यायाधीशांनी गोव्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्किट बेंच स्थापनेसाठी सकारात्मक पावले उचलली तर त्यांचे आभार कोल्हापूरची जनता कायम मानणार आहे. सर्किट बेंचसाठी महापालिकेनेही शेंडा पार्क येथील जागा निश्चित केली आहे. त्यामुळे लवकरच सर्किट बेंच मंजूर होणार आहे. यावेळी अ‍ॅड. श्रेणिक पाटील, अ‍ॅड. डी. डी. घाटगे, अ‍ॅड. संपतराव पवार, आदी वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.


माणिक मुळीक यांचे प्रतिपादन
महापालिकेतर्फे चबुतरा आणि पुतळ्यास जागा उपलब्ध करून देऊ : महापौर

Web Title: The statue of the beam is approved by the circuit bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.