(कोल्हापूरसह राज्यासाठी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:34+5:302020-12-09T04:19:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. पंजाबमध्ये ...

(कोल्हापूरसह राज्यासाठी)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहेत. पंजाबमध्ये बाजार समित्यांचा आठ टक्के कर बुडत असल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन शेतकऱ्यांचे नाही तर दलालांचे, ज्यांचे कमिशन बुडते त्यांचे आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
या कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ आयोजित पत्रकार परिषदेत पाटील मंगळवारी बोलत होते. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले.
पाटील म्हणाले, जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात, तेव्हा-तेव्हा असा विरोधच केला जातो. गोपीनाथ मुंडे यांनी उसाची झोनबंदी उठवली तेव्हाही कारखानदारांनी आकांडतांडव केले होते; परंतु मुंडे हटले नाहीत. त्यांनी निर्णय राबविला. आता ऊस उत्पादक शेतकरी जिथे दर जास्त मिळेल तेथे ऊस घालत आहेत. मी पणनमंत्री असताना २०१७ साली कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन मुक्तीचा कायदा आणला होता. तेव्हाही १५ दिवस समित्या बंद राहिल्या; पण सरकार हटले नाही. शेतकऱ्यांना त्यामुळे कुठेही माल विकण्याची मुभा मिळाली. म्हणून बाजार समितीचे उत्पन्न एकदमच बंद झाले असे होत नाही. ती व्यवस्थाही नव्या कायद्यात कायम ठेवण्यात आली आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.
भारतातील अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. पंजाबमधूनच हे आंदोलन उभारले; कारण तेथे बाजार समित्यांचा आठ टक्के कर या कायद्यामुळे बुडणार आहे; पण शेतकऱ्यांना कुठेही दर मिळेल तेथे माल विक्री करण्यासाठी परवानगी दिली तर त्यात काय अडचण आहे?
चौकट
बंटीसाहेबांच्या हवाई राजकारणात हे बसत नाही !
सतेज पाटील म्हणताहेत की, बांधावर गेलं की शेतकरीच जाब विचारतील; पण गेले महिनाभर समरजित घाटगे आणि भाजपचे कार्यकर्ते बांधावरच नाही, शेतात जाऊन शेतकऱ्यांसोबत भाकरी खाऊन या कायद्याबाबत सांगत आहेत. त्यांना कुठेही विरोध होत नाही; पण बंटीसाहेबांच्या हवाई राजकारणात हे बसत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. कायदे रद्द होणार नाहीत, असे मी म्हटले तर हसन मुश्रीफांना अडचण काय? अशीही विचारणा पाटील यांनी केली.