राज्य नाट्य स्पर्धा आजपासून
By Admin | Updated: November 24, 2015 00:21 IST2015-11-23T23:47:36+5:302015-11-24T00:21:34+5:30
१५ संघांचा सहभाग : रात्री दहा वाजता होणार नाटकांचे सादरीकरण

राज्य नाट्य स्पर्धा आजपासून
कोल्हापूर : हौशी कलाकारांना कलागुणांच्या सादरीकरणाचे व्यासपीठ असणाऱ्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला आज, मंगळवारी प्रारंभ होणार आहे. या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवनात रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तुकाराम माळी तालीम मंडळाचे ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक सादर होणार आहे. स्पर्धा १० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये १५ संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील प्रत्येक नाटकासाठी १५ रुपये तिकीट दर असणार आहे. स्पर्धेतील सहभागी संघांनी सराव करून जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याचे स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, स्पर्धेतील नाटकांची वेळ सायंकाळी सात वाजता निश्चित केली होती. मात्र, स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी पूर्वनियोजनानुसार १ ते ७ डिसेंबर या कालावधीत अवि पानसरे व्याख्यानमाला होणार आहे. यामुळे या कालावधीतील नाटकांची वेळ रात्री दहाची करावी लागणार होती. याबाबत सहभागी संघांनी स्पर्धेची एकच वेळ करण्याची मागणी केली. त्यानुसार यंदा स्पर्धेतील सर्व नाटके रात्री दहा वाजता सादर होतील. (प्रतिनिधी)
स्पर्धेत सादर होणारी नाटके
दिनांकसंस्था, कंसात नाटक
२४ नोव्हेंबरतुकाराम माळी तालीम मंडळ
(साखर खाल्लेला माणूस)
२५ नोव्हेंबरहनुमान तरुण मंडळ (अग्निदिव्य)
२६ नोव्हेंबरसुगुण नाट्य संस्था (इच्छा माझी पुरी करा)
२७ नोव्हेंबररुद्राक्ष अकॅडमी (डॅडी आय लव्ह यू)
३० नोव्हेंबररंगयात्रा नाट्य संस्था (कदाचित)
१ डिसेंबरप्रत्यय नाट्य संस्था (कबीर)
२ डिसेंबरप्रतिज्ञा नाट्य संस्था (सुवर्णपदक)
३ डिसेंबरफिनिक्स क्रिएशन्स (नाव झालेच पाहिजे)
४ डिसेंबरप्रज्ञान कला अकॅडमी (आला रे राजा)
५ डिसेंबर परिवर्तन कला फौंडेशन (महामृत्युंजय)
६ डिसेंबरनाट्यशुभांगी संस्था (भूलभुलैया)
७ डिसेंबरकुंभी-कासारी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ
(आशानाम मनुष्याणाम)
८ डिसेंबरदेवल क्लब (सूक्ष्म आणि पूर्ण)
९ डिसेंबर भालजी पेंढारकर कला केंद्र (युगांत)
१० डिसेंबरअभिरुची संस्था (बळी)