लोकाभिमुख धोरणांमुळे राज्यात राजकीय स्थैर्य
By Admin | Updated: September 5, 2014 21:53 IST2014-09-05T21:53:24+5:302014-09-05T21:53:24+5:30
वसंत भोसले यांचे प्रतिपादन : शांतारामबापू गरूड स्मृतिदिनी ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ विषयावर व्याख्यान

लोकाभिमुख धोरणांमुळे राज्यात राजकीय स्थैर्य
इचलकरंजी : स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर महाराष्ट्राच्या रचनेमध्ये भौगोलिक स्थित्यंतरे झाली. त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम दिसून आला, पण राज्याच्या विधानसभेने वेळोवेळी पुरोगामी विचारसरणीने आणि विकासात्मक ध्येय-धोरणांना अनुसरून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कधीही अस्थिरता आली नाही. अलीकडच्या काळात समाजकारणापासून राजकीय पक्षांची फारकत होऊ लागल्याने राजकारणात आता अस्थिरता जाणवू लागली आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.
येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये प्रबोधिनीचे संस्थापक आचार्य शांताराम गरुड यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र विधानसभेची वाटचाल’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे वय ५४ असले तरी राज्याच्या विधानसभेचे वय ७७ आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९३७ मध्ये ब्रिटिशांनी प्रांतिक विधानसभेची स्थापना केली. त्या काळापासूनच विधानसभेवर कॉँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.
महाराष्ट्राच्या सन १९८० पर्यंतच्या कालखंडात सर्वच विधानसभांमध्ये कॉँग्रेसचे बहुमत होते. सर्व विरोधी पक्षांचे मिळून ३० ते ४० आमदार असत.
मात्र, त्या काळातील विरोधी पक्षांच्या अभ्यासू लोकप्रतिनिधींमुळे सत्ताधाऱ्यांवर एक प्रकारचा अंकुश असे. विरोधकांच्या प्रभावामुळे आणि राज्यात असलेली लोकाभिमुख सहकार चळवळ, पुरोगामी विचारसरणी, विकास-विधायक कामांसाठी होणारी ध्येय-धोरणे यामुळे महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला. एक वैचारिक बैठक राज्याच्या राजकारणाला असल्यामुळे राजकीय क्षेत्रात कधीही अस्थिरता आली नाही. महाराष्ट्राचा इतिहास अत्यंत चांगला आहे. मात्र, अलीकडच्या काळामध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता वर्तमान फारसा बरा नाही. वास्तविक पाहता सध्या सरकारकडे पैसा, आधुनिक तंत्रज्ञान, साधनसामग्री, सुशिक्षित मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध असतानासुद्धा राजकीय दिवाळखोरीमुळे विकासाची संधी गमावत आहे. राजकीय कुरघोड्या खेळण्यातच स्वारस्य असलेल्या लोकप्रतिनिधी व नेते यांची लोकांप्रती असलेली संवेदना बोथट झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला आचार्य गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. नगरसेवक शशांक बावचकर यांनी स्वागत केले, तर प्रा. रमेश लवटे यांनी प्रास्ताविक केले. अन्वर पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)