राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन स्पर्धा ३१ ला
By Admin | Updated: January 3, 2016 00:38 IST2016-01-03T00:38:27+5:302016-01-03T00:38:27+5:30
प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेचा दर्जा : ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’ ‘मोकळा करा पंचगंगेचा श्वास,..... ’ हे घोषवाक्य

राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन स्पर्धा ३१ ला
कोल्हापूर : ‘समता, साक्षरता व क्रीडा विकास’ हा राजर्षी शाहूंचा विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी बिनखांबी गणेश मित्रमंडळातर्फे आयोजित शाहू मॅरेथॉन स्पर्धा यंदा ३१ जानेवारीला सकाळी सहा वाजता होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’- ‘मोकळा करा पंचगंगेचा श्वास, मग धरा स्मार्ट सिटीचा ध्यास’ हे घोषवाक्य घेऊन प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष किसन भोसले व कार्याध्यक्ष द्वारकानाथ नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भोसले म्हणाले, यंदा या मॅरेथॉन स्पर्धेचे २२ वे वर्ष असून, बिनखांबी गणेश मंदिर येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेला यंदा महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनने प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेचा दर्जा दिला आहे. खुल्या पुरुष गटासाठी २१.२ किलोमीटर, तर खुल्या महिला गटासाठी १० किलोमीटर असा टप्पा आहे.
तसेच शालेय मुले व मुली वयोगट १४ ते १७, १२ वर्षांखालील मुले व मुली गट, प्रौढ गट ४५ ते ५५, ६५ वर्षांवरील प्रौढ गट व ४५ वर्षांवरील महिला गट, १० वर्षांवरील मुले, मुली अशा विविध गटांत स्पर्धा होणार आहे. याशिवाय खास दिव्यांग (अंध) गटासाठी फन रन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना एकूण एक लाख साठ हजार रुपयांची रोख व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यंदाही स्पर्धेत एकूण पाच हजारांहून अधिक धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा संयोजकांना आहे. इच्छुकांनी मंडळाच्या बिनखांबी गणेश मंदिर चौकातील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे. १४, १७ व १० आणि १२ वयोगटातील स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश मोफत आहे.
यावेळी सचिव प्रताप घोरपडे, विजय सासने, अरुण सावंत, धीरज पाटील, संजय सातपुते, नरेंद्र इनामदार, बाळासाहेब कडोलकर, महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आर. डी. पाटील, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, एम. वाय. पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)