राज्यस्तरीय पदांची तहान जिल्हास्तरीय पदांवर
By Admin | Updated: April 22, 2015 00:26 IST2015-04-21T23:18:36+5:302015-04-22T00:26:38+5:30
जिल्हा बॅँक निवडणूक : पदे नसल्याने बॅँकेच्या संचालकपदासाठी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

राज्यस्तरीय पदांची तहान जिल्हास्तरीय पदांवर
अशोक पाटील - इस्लामपूर
तब्बल ६३ वर्षांपासून सुरू असलेली सांगली जिल्ह्यातील मंत्रिपदाची परंपरा राज्यातील यंदाच्या सत्ताबदलानंतर खंडित झाली. महामंडळे व अन्य मानाच्या पदांपासूनही जिल्हा वंचितच आहे. त्यामुळे राज्यस्तरीय पदांची ही तहान आता जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना जिल्हा बॅँकेच्या संचालकपदावर भागवावी लागत आहे. आजी-माजी आमदार, माजी मंत्री यांनी त्यासाठीच धडपड सुरू केली आहे. राज्याच्या राजकारणात कधीकाळी दबदबा निर्माण करणारे नेतेही जिल्हा बॅँकेच्या संचालकपदासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री एन. डी. पाटील, जयंत पाटील, मदन पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव नाईक, प्रतीक पाटील यांनी मंत्री म्हणून जिल्ह्याची ही परंपरा अखंडित ठेवली होती. राज्यातील सत्तांतरानंतर सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. आघाडी काँग्रेसमधील नेत्यांचे अनेक पिढ्यांपासून सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. सध्या त्यांच्याकडे मंत्रीपद, सत्ता नसल्याने या सर्वांनाच जिल्हा बँकेच्या सत्तेचे वेध लागले आहेत.
वसंतदादा पाटील यांनी राज्यस्तरीय राजकारणात पाऊल टाकल्यानंतर कधीच जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थेत लक्ष घातले नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर गुलाबराव पाटील, बाजीराव बाळाजी पाटील यांना सलग ११ वर्र्षांची संधी दिली. या काळात जिल्हा मध्यवर्ती बँक नफ्यात होती. अलीकडील काही वर्षांत राज्य पातळीवरील नेत्यांनीही बँकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याने बँकेचा कारभार एकहाती राहिला नाही. त्यामुळे बँक तोट्याच्या दिशेने वाटचाल करीत राहिली.
केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. सांगली जिल्ह्यात मात्र आ. डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील, प्रतीक पाटील, शिवाजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या सहकारी संस्था काही अपवाद वगळता सुरळीत सुरू आहेत. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक या दिग्गज नेत्यांसह इतर तालुक्यातील राष्ट्रवादी नेत्यांच्या काँग्रेसला तोडीस तोड सहकारी संस्था आहेत.
आजची परिस्थिती पाहता मंत्रिपदापासून सांगली जिल्हा पोरका झाला आहे. त्यामुळेच की काय जिल्हा पातळीवरील बँकेच्या निवडणूक रिंगणात आजी, माजी आमदार, माजी मंत्री मोठ्या हिरीरीने उतरले आहेत.
भाजप-सेनेच्या नेत्यांची धडपड
खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार शिवाजीराव नाईक हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते यापूर्वी सर्वच पक्षांची चाचपणी करून आलेले आहेत, तर आमदार सुरेश खाडे हे भाजपचे एकनिष्ठ आहेत. त्यांच्याकडे सहकारी संस्थांचे जाळे नाही. अनिल बाबर यांनी आमदार असतानाही बँकेवर निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.