‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर राज्यात भारी
By Admin | Updated: October 17, 2015 00:21 IST2015-10-17T00:15:43+5:302015-10-17T00:21:05+5:30
४९९७ कोटी शेतकऱ्यांना अदा : फक्त १२८ कोटी प्रलंबित

‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर राज्यात भारी
कोल्हापूर : गत हंगामातील ‘एफआरपी’ देण्यात कोल्हापूर विभाग राज्यात आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत ५१२५ कोटी ४९ लाखांपैकी तब्बल ४९९७ कोटी ४९ लाख रुपये (९८.१७ टक्के) शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. अद्याप कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ८१ कोटी, तर सांगली जिल्ह्यातील ४७ कोटी असे १२८ कोटी प्रलंबित आहेत.
साखरेचे दर पडल्याने गत हंगामात एफआरपीचा तिढा निर्माण झाला आहे. कोल्हापूर वगळता एकाही जिल्ह्याने एकरकमी एफआरपीची रक्कम दिलेली नाही. साखर कारखान्यांकडे पैसे उपलब्ध न झाल्याने उसाचे पैसे थकले आहेत. दुसरा हंगाम तोंडावर आला असताना सहा-सात महिन्यांपूर्वी तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. केवळ कोल्हापूर विभागातील साखर कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे देय रकमेपैकी तब्बल ९८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा केली आहे.
गत हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १ कोटी ६३ लाख ४४ हजार टन गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे ३३३१ कोटी २५ लाख रुपये रक्कम होते. त्यापैकी ३२५० कोटी २५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झालेले आहेत. पाच साखर कारखान्यांकडे केवळ ८१ कोटी (२.४३ टक्के) देय रक्कम आहे. सांगलीत ७७ लाख ४३ हजार टन उसाचे गाळप झाले होते. ‘एफआरपी’प्रमाणे १७९४ कोटी २४ लाख रुपये होते, त्यापैकी १७४७ कोटी २४ लाख रुपये अदा झालेले आहेत. दहा कारखान्यांकडे ४७ कोटी रुपये प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)