जिल्हा बँकेच्या व्याजमाफीचे राज्याकडून अनुकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:26 IST2021-02-11T04:26:49+5:302021-02-11T04:26:49+5:30

तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज : जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना होणार लाभ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तीन लाखापर्यंतचे कर्ज ...

State imitation of District Bank's interest waiver | जिल्हा बँकेच्या व्याजमाफीचे राज्याकडून अनुकरण

जिल्हा बँकेच्या व्याजमाफीचे राज्याकडून अनुकरण

तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज : जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना होणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : तीन लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बँकेने महिन्यापूर्वीच घेतला आहे. त्याचे अनुकरण राज्य शासनाने केले आहे. तीन लाखापर्यंत पीक कर्जाची उचल करणारे जिल्ह्यात २ लाख ५२ हजार शेतकरी असून, त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

नाबार्ड शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत पीक कर्ज बिनव्याजी देते. तीन लाखापर्यंतचे कर्ज २ टक्क्यांनी देते. जिल्हा बँक व विकास संस्थांना त्यांच्या व्याजाचा परतावा दिला जातो. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास ऊस पिकाला एकरी ४० हजार रूपये कर्ज दिले जाते. त्यामुळे अडीच एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमीनधारणा विचारात घेता, सरासरी अडीच ते तीन एकर क्षेत्र असणारे बहुतांशी शेतकरी आहेत. त्यामुळे एक लाखावरील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचा लाभ होण्यासाठी जिल्हा बँकेने तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज हे बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात पहिल्यांदा अशाप्रकारचा निर्णय घेऊन कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्याचेच अनुकरण राज्य शासनाने केले आहे.

पाच लाख बिनव्याजीचा लाभ २०० जणांनाच

आगामी काळात पाच लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याबाबत जिल्हा बँकेच्या सभेत अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सुतोवाच केले होते. पाच लाखांचे पीक कर्ज मिळण्यासाठी एका शेतकऱ्याकडे साडेबारा एकर जमीन पाहिजे. जिल्ह्यातील जमीनधारणेचे प्रमाण पाहिले तर दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनाच याचा लाभ होऊ शकतो.

Web Title: State imitation of District Bank's interest waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.