कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यास राज्य सरकारच तयार नसल्याची शंका कोल्हापूरकरांच्या मनात येऊ लागली आहे. हद्दवाढीसारख्या कोल्हापूर शहराच्या महत्त्वाच्या विषयावर बैठकीसाठी मुंबईत अधिकाऱ्यांना बोलावून घेतल्यानंतर सुद्धा दोन दोन दिवस बैठक घ्यायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ मिळत नाही यावरूनच सरकार याबाबत निर्णय घेण्याच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने सोमवारी दुपारी दोन वाजता मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु, रात्री आठ वाजले तरी उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीसाठी पोहचले नव्हते. शेवटी ही बैठक रद्द करून पुन्हा मंगळवारी ही बैठक घेण्याचे ठरले, परंतु मंगळवारी देखील शिंदे या बैठकीसाठी आले नाहीत. शेवटी ही बैठकही देखील रद्द करण्यात आली.कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून शहरी व ग्रामीण जनतेत संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने सुरू आहेत. समर्थक व विरोधक आमने-सामने आले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्य सरकारला याचे काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. महापालिका, प्राधिकरणाचे अधिकारी गेले दोन दिवस आपली सगळी कामे बाजूला ठेऊन मुंबईतील बैठकीसाठी ठाम मांडून बसले आहेत. तरीही उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकले नाहीत याचाच अर्थ त्यांना हद्दवाढीवर निर्णय घ्यायचा नाही की काय, अशी शंका कोल्हापूरकरांच्या मनात बळावत चालली आहे.दोन दिवसांपासून कोल्हापूरकर या बैठकीत काही तरी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा बाळगून आहेत. शहराची हद्दवाढ करणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी एकदा नाही तर दोन तीन वेळा आश्वासन दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असताना जर शिंदे नियोजित बैठकही घेत नसल्यामुळे त्यांच्यावर अन्य कोणाचा दबाव आहे की काय, अशीही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके पहिल्यापासून ग्रामिण भागातील जनतेला विश्वासात घेऊनच हद्दवाढीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी करत आहेत. त्यांना विश्वासात घेण्यासाठी तरी बैठका व्हायला पाहिजेत, चर्चा व्हायला पाहिजेत. त्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने या प्रश्नात चालढकल केली जात असावी, अशी शंका उपस्थित होत आहे.बैठक झाल्याचा क्षीरसागर यांचा दावादरम्यान, मंत्रालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दुसरी बैठक पार पडल्याचा दावा करत, या बैठकीत दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवून हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल. हद्दवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक होण्याची शक्यता असून, त्यामध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची आशा असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर हद्दवाढीबाबत राज्य सरकारच उदासीन ?, उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीकडे फिरकलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:03 IST