‘राज्य नाट्य’चा समारोपही हाऊसफुल्ल
By Admin | Updated: December 5, 2014 00:21 IST2014-12-05T00:08:32+5:302014-12-05T00:21:56+5:30
या स्पर्धेत एकूण सतरा संघांची नाटके सादर झाली

‘राज्य नाट्य’चा समारोपही हाऊसफुल्ल
कोल्हापूर : गेल्या सतरा दिवसांपासून मायबाप रसिक प्रेक्षकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणाऱ्या ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आज, गुरुवारी रसिकांच्या मांदियाळीत समारोप झाला. दुपारी साडेबाराची वेळ असतानाही सभागृहातील गर्दी प्रेक्षकांच्या दर्दीपणाचेच द्योतक आहे. हौशी रंगभूमी चळवळीला लोकाश्रय मिळत नाही, हा निराशावादी सूर आता विरून गेला आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित व शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या या स्पर्धेत एकूण सतरा संघांची नाटके सादर झाली. त्यात कोल्हापूरसह इचलकरंजी, कणकवली, सिंधुदुर्ग, बेळगाव येथील नाट्यसंस्थांचाही सहभाग होता. शाहू स्मारक भवनची आसनक्षमताच मर्यादित असल्याने सभागृह भरलेले दिसत असले तरी सतरा दिवस यात सातत्य असणे हीदेखील महत्त्वाची गोष्ट होती. काही सुगुण, हनुमान, वरेरकर.. अशा पाच-सहा नाटकांना तर हॉलमध्ये उभे राहायलादेखील जागा नव्हती. प्रेक्षकांनी खाली बसून व बाहेर उभे राहून नाटकांचा आस्वाद घेतला. यावरून त्यांच्या अभिरुचीची कल्पना येते.
आज बेळगावमधील वरेरकर नाट्य संस्थेने ‘वेडिंग अल्बम’ हे नाटक सादर केले. शाहू स्मारकच्या अनुपलब्धतेमुळे या नाटकाची वेळ दुपारी साडेबारा ठेवण्यात आली होती. तरीही हॉल प्रेक्षकांनी भरून वाहत होता. कोल्हापूरच्या हौशी रंगभूमीला आलेली मरगळ ‘राज्य नाट्य’ने दूर केली; तर यंदा दर्जेदार नाटके आणि रसिक प्रेक्षकांनी दिलेली दाद यांमुळे कोल्हापूरचे गतवैभव परत मिळण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.
स्पर्धेची वेळ संध्याकाळी सात
राज्य नाट्य स्पर्धा अन्य सर्व केंद्रांवर संध्याकाळी सात वाजता सुरू होते. कोल्हापुरात मात्र प्रेक्षकांचा अनुभवावरून रात्री साडेआठची वेळ ठेवली. मात्र, लांब राहणाऱ्या नागरिकांना रात्रीच्या वेळी नाटके पाहायला येणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे नाटकांची वेळ संध्याकाळी सात किंवा साडेसातची असावी, अशी मागणी रसिकांनी व नाट्यक्षेत्राशी निगडित व्यक्ती व संस्थांनी संयोजकांकडे केली. संयोजन समितीतील प्रशांत जोशी यांनीही वेळ बदलण्यात येईल, असे सांगितले.