नवमतदारांसाठी विशेष मोहीम सुरू

By Admin | Updated: December 5, 2014 00:25 IST2014-12-04T23:56:40+5:302014-12-05T00:25:36+5:30

१६ डिसेंबरपर्यंत नोंदणी : २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

Starting a special campaign for the newcomers | नवमतदारांसाठी विशेष मोहीम सुरू

नवमतदारांसाठी विशेष मोहीम सुरू

कोल्हापूर : तरुण मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नयेत, त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा, गत मतदारनोंदणीत राहिलेले मतदार त्याचबरोबर दुबार, मृत झालेले मतदार कमी करणे यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून १ डिसेंबरपासून विशेष मतदार नोंदणी मोहीम सुरू केली आहे. १६ डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असून, २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
१ जानेवारी २०१५ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या तरुणांसाठी ही मोहीम आहे. जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग नोंदवावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा निवडणूक विभाग व संबंधित तहसील कार्यालय अशी दोन्हींकडे ही नोंदणी सुरू आहे. प्रारूप मतदार यादी १ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ७ व १४ डिसेंबर असे दोन दिवस नोंदणीकरिता ठेवण्यात आले आहेत. १५ जानेवारीला प्राप्त अर्जांवर हरकती घेतल्या जातील. २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
नावनोंदणीसह पत्ता बदललेली माहिती भरण्यासाठी असलेल्या फॉर्मची रचना अशी : नव्याने नाव नोंदविण्यासाठी नमुना ६ क्रमांकाचा फॉर्म भरावयाचा आहे. नमुना ६-अ अनिवासी भारतीयांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी. नमुना ७ - मतदार यादीतील नावनोंदणीसंदर्भात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव कमी करण्यासाठी. नमुना ८ - मतदार यादीतील आपल्या तपशिलामध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास. नमुना ८ अ- विधानसभा मतदारसंघांतर्गत आपला पत्ता बदलला असल्यास हे अर्ज भरावयाचे आहेत. भरलेले हे विहित नमुन्यातील आपले अर्ज व हरकती सर्व मतदार मदत केंद्र, अतिरिक्त मतदान केंद्र असे निर्देशित केलेल्या मतदान केंद्रांवर स्वीकारले जात आहेत.
विशेष मोहिमेचे काम सुरू आहे. सर्व गावांत व मतदान केंद्रांवर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. त्याबाबतचा अहवाल तालुकास्तरावरून जिल्हा निवडणूक विभागाकडे प्राप्त झाला आहे. १६ डिसेंबरला याबाबत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Starting a special campaign for the newcomers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.