गणेशोत्सवाची लगबग सुरू
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:50:00+5:302014-08-17T00:54:08+5:30
मूर्ती रंगकामाला वेग : मंडळांची तयारी, शोभेच्या साहित्यांचे स्टॉल्स

गणेशोत्सवाची लगबग सुरू
कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर आल्याने सर्वत्र उत्सवाच्या तयारीची लगबग सुरू आहे. कुंभारबांधव गणेशमूर्ती घडविण्याच्या आणि मूर्तींना रंग देण्यासाठी रात्रीचा दिवस करीत आहेत. दुसरीकडे सार्वजनिक मंडळे वर्गणी गोळा करत आहेत... शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी कोल्हापूरकर उत्साहाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.
भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव सुरू होतो. यंदा २९ तारखेला गणेशोत्सव आहे. उत्सवाला मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने आता तयारीला वेग आला आहे. गणरायाच्या आगमनासाठी घराघरांत स्वच्छता मोहीम, शोभेच्या साहित्यांची शोधाशोध, गणेशमूर्तींचे बुकिंग, मंडळांची वर्गणी, मांडव उभारणीची घाई ही सगळी कामे
करताना आबालवृद्धांची धांदल उडाली आहे.
मंडळांकडून वर्गणी
शहरात तीन हजारांवर गणेश मंडळे आहेत. या मंडळांचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी घरोघरी, परिसरातील दुकाने, कार्यालयांमध्ये जात आहेत. कमीत कमी दीडशे रुपये वर्गणी घेतली जात आहे. याशिवाय गणेशोत्सवाचे ठेवणीतले शोभेच्या साहित्यांची शोधाशोध, यंदाच्या वर्षी खरेदी कराव्या लागणाऱ्या वस्तू, उत्सवादरम्यान कोणकोणते धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम घ्यायचे यावर चर्चा सुरू आहे, तर मोठ्या मंडळांच्या गणेशमूर्तींसाठी मांडव उभारणीला सुरुवात झाली आहे.
गणेशमूर्तींचे बुकिंग
कुंभारबांधव दोन-तीन महिने आधीपासूनच वेगवेगळ्या रूपातील घरगुती गणेशमूर्ती बनवत असतात. शेवटच्या आठ-दहा दिवसांत त्यांचे बुकिंग सुरू होते.
काही कुटुंबांमध्ये एकाच प्रकारची गणेशमूर्ती वर्षानुवर्षे बनवून तिच्यासाठी आकर्षक दागिने घडविले जातात, तर काही भाविक दरवर्षी वेगळ््या रूपातील गणेशमूर्ती बसवितात. नागरिकांना मनपसंत मूर्ती घेता यावी यासाठी कुंभार गल्लीसह शहरातील चौकात, मुख्य रस्त्यावर गणेशमूर्तींचे स्टॉल लावण्यात आले आहेत. येथे सहकुटुंब येऊन नागरिक गणेशमूर्तींचे बुकिंग करीत आहेत.
माळा..झुरमुळ््या...
पाच दिवसांसाठी आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी आणि आरासासाठी सुरेख माळा, झुरमुळ््या अशा शोभेच्या वस्तूंचेही बाजारात आगमन झाले आहे. मेटल, प्लास्टिकसह विविध प्रकारच्या लांबच लांब माळा, कंठी, मोती हार, रेशमी हार, कागदीपंखे, वेली, झालर यांसह आसन अशा दुकानाबाहेर लावण्यात आलेले शोभेचे साहित्य मन आकर्षूण घेत आहेत. (प्रतिनिधी)
रंगकामाला वेग
४भाविकाला त्यांच्या मनातली श्री गणेशाची मूर्ती सुपूर्द करण्यासाठी कुंभार बांधव आता रात्रीचा दिवस करीत आहेत. शहरातील मार्केट यार्ड, बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश या सर्वच ठिकाणी मूर्तींच्या रंगकामाला सुरुवात केली आहे.
४मंडळांच्या गणेशमूर्तींचे काम घरातील कर्ती पुरुष मंडळे करीत आहेत, तर घरगुती गणेशमूर्तींचे काम महिला आणि मुलींनी सांभाळले आहे. ज्या मंडळांनी गणेशमूर्तींची आॅर्डर उशिरा दिली आहे त्यांच्या गणेशमूर्ती एकीकडे बनविल्या जात आहेत. दुसरीकडे कामगार मंडळी रंगकामात गुंतले आहेत. कुंभारवाड्यातील घराघरांत सुरेख गणेशमूर्ती दिसू लागल्या आहेत.