गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात 'नॉन कोविड' रुग्णांवर उपचार सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:27 IST2021-08-21T04:27:14+5:302021-08-21T04:27:14+5:30
राम मगदूम गडहिंग्लज: गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीअभावी खासगी रुग्णालयात उपचार घेऊ न शकणाऱ्या ...

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात 'नॉन कोविड' रुग्णांवर उपचार सुरू करा
राम मगदूम
गडहिंग्लज:
गडहिंग्लज विभागातील कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीअभावी खासगी रुग्णालयात उपचार घेऊ न शकणाऱ्या अन्य आजारांच्या गोरगरीब रुग्णांची परवड थांबवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड व कागलच्या कापशी खोऱ्यासह सीमाभागातील अनेक गोरगरीब रुग्ण उपचारासाठी गडहिंग्लजच्या उपजिल्हा रुग्णालयात हक्काने येतात. त्यामुळे बाह्य रुग्णांची दैनंदिन संख्या साडेतीनशे ते चारशेच्या घरात जाते.
महिन्याकाठी सुमारे १३० ते १५० प्रसूती होतात. त्यापैकी निम्म्या प्रसूती सिझेरिअन पद्धतीने होतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळतो. याशिवाय किरकोळ आजारांसह अस्थीरोग, नेत्ररोग, बालरोग, विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया आणि मोफत औषधोपचाराची सोय याठिकाणी आहे. त्यामुळे गरिबांचा दवाखाना म्हणूनच या दवाखान्याची ओळख निर्माण झाली आहे.
तथापि, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेतही जिल्हा प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कोविडव्यतिरिक्त अन्य आजाराने त्रस्त रुग्ण, अपघातग्रस्त व सर्पदंशाच्या रुग्णांची मोठी कुचंबणा होत आहे.
------------------------
कोरोना रुग्णांची संख्या घटली
केवळ १०० बेडची क्षमता असतानाही उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १३० ते १५० कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले; परंतु अलीकडे याठिकाणी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या ५० च्या आत आली आहे. त्यामुळे पूर्ववत अन्य रुग्णांवरही उपचार सुरू करावेत, अशी मागणी आहे.
--------------------------
५० बेड अन्य रुग्णांसाठी ठेवा
अलीकडे कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे १०० पैकी कोविडसाठी ५० व नॉन कोविडसाठी ५० अशी सोय करून अन्य गरजू रुग्णांना दिलासा देणे शक्य आहे. याठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह आधुनिक उपचाराची सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे गरिबांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
--------------------------
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय : २००८२०२१-गड-०५