श्रीसूक्त लक्ष पठण महाअनुष्ठानचा प्रारंभ
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30
अंबाबाई मंदिरातील कार्यक्रम : मूर्तिसंवर्धन अंतर्गत धार्मिक विधी

श्रीसूक्त लक्ष पठण महाअनुष्ठानचा प्रारंभ
कोल्हापूर : अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक प्रक्रियेअंतर्गत असलेल्या धार्मिक कार्यक्रमांत शुक्रवारी सहस्रचंडी व श्रीसूक्त लक्ष पठण या महाअनुष्ठानांना प्रारंभ झाला. यावेळी श्री गणपती विधान व श्री सौरसूक्त विधान यांचेही समापन झाले.
मूर्ती संवर्धनांतर्गत सुरू असलेल्या धार्मिक विधींच्या तिसऱ्या दिवशी कलाकर्षण विधी पूर्ण झाल्यानंतर मुख्य यज्ञमंडपात सर्व विधींना प्रारंभ झाला. त्यात सहस्रचंडी महाअनुष्ठानाचे पुण्याहवाचन झाले. अंबाबाईचा महिमा वर्णन करणारा ‘श्री सप्तशती’ हा ग्रंथ आहे. मार्कंडेय पुराणातील देवीमहिमा वर्णन करणाऱ्या सातशे श्लोकांचा समुच्चय म्हणजे ‘सप्तशती.’ या सातशे श्लोकांचे विशिष्ट पद्धतीने केलेले पठण म्हणजे एक पाठ. असे एक हजार पाठ करून त्याच्या एक दशांश म्हणजे शंभर पाठांचे हवन केल्यानंतर सहस्रचंडी महाअनुष्ठान पूर्ण होते. या अनुष्ठानासाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली, औदुंबर, निपाणी व चिकोडी येथील शंभर ब्रह्मवृंद सहभागी झाले. वरदलक्ष्मी व मंदार मुनीश्वर, चित्रा व आशुतोष कुलकर्णी या दाम्पत्यांनी या महाअनुष्ठानाचे यजमानपद स्वीकारले. सोमवार (दि. २७) पर्यंत हे अनुष्ठान चालणार आहे.
ऋग्वेदातील श्रीसूक्त हेही जगदंबेची साधना करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. एकूण सोळा ऋचा असलेल्या या सूक्ताची एक लाख आवर्तने व त्याच्या दशांश म्हणजे एक हजार आवर्तनांचे हवन असे या अनुष्ठानाचे स्वरूप आहे. हे विधान पाच दिवस चालणार असून मंगळवारी (दि. २८) त्याचे हवन होणार आहे. दीपा व अजित ठाणेकर यांनी या अनुष्ठानाचे यजमानपद स्वीकारले आहे. आसावती व अरुण मुनीश्वर यांनी महागणपती विधान व सविता व किशोर मुनीश्वर यांनी श्री सौरसूक्त विधान संपन्न केले.शुक्रवारपासून गरुड मंडपात उपासनाधामही सुरू झाले. श्रीपूजक मंडळाच्या सर्व पुरुष व महिला सदस्यांनी या उपक्रमात उपासना केली. यावेळी श्रीसूक्ताची एक हजार आवर्तने, तसेच हनुमान चालिसाचे निरंतर पठण करण्यात आले. तसेच संगीत देवी भागवत विश्वास देशमुख घोडजकर यांच्या प्रवचन सप्ताहास प्रारंभ झाला. रात्री महेश हिरेमठ व सहकाऱ्यांनी गायन सादर केले. शनिवारी सहस्रचंडी व श्रीसूक्त लक्ष जप ही महाअनुष्ठाने चालू राहणार आहेत. तसेच करवीरमाहात्म्य सप्ताह वाचन व श्री गुरुचरित्र पारायणास प्रारंभ होईल. तसेच श्री महाकाली विधानाचे अनुष्ठान व संध्याकाळी पाच वाजता संगीत देवीभागवत होईल.
रासायनिक संवर्धनास हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध नाही
कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीवर होणाऱ्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
अंबाबाईच्या मूर्तीच्या संवर्धनाला एका समितीने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू एकताच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी रासायनिक संवर्धन प्रक्रिया ही धर्मविरोधी असूच शकत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया विनाअडथळा, विनासायास पूर्ण व्हावी, अशी मते मांडण्यात आली. बैठकीस हिंदू एकताचे दीपक मगदूम, अण्णा पोतदार, गजानन तोडकर, दिलीप भिवटे, हिंदुराव शेळके, चंद्रकांत बराले, उदय पोवार, किशोर घाटगे, शिवाजीराव ससे, नगरसेवक आर. डी. पाटील, बंडा साळुंखे, महेश उरसाल, शीतल पोतदार, भागवत पोतदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)