शिंगणापूर उपसा केंद्र सुरु होण्यास विलंब होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:02+5:302021-07-30T04:26:02+5:30
कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील सात मोटारी अद्यापही आठ फूट खोल पाण्यात असून, त्या दुरुस्त करुन पाणी पुरवठा ...

शिंगणापूर उपसा केंद्र सुरु होण्यास विलंब होणार
कोल्हापूर : शिंगणापूर येथील उपसा केंद्रातील सात मोटारी अद्यापही आठ फूट खोल पाण्यात असून, त्या दुरुस्त करुन पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शनिवारपर्यंत या केंद्रातील मोटारी सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सफल होण्याची शक्यता कमी आहे. सोमवारपासून एक-एक मोटार जोडून पाणी पुरवठा टप्पाटप्प्याने सुरु करावा लागणार आहे. दरम्यान, शहराच्या बहुतांशी भागात नागरिकांची अद्यापही पाण्यासाठी धावपळ सुरु असून, टँकरमधील पाणी मिळवताना फारच ओढाताण होऊ लागली आहे.
शहराच्या साठ टक्के भागाला पाणी पुरवठा करणारे शिंगणापूर उपसा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु, गेल्या गुरुवारी मध्यरात्रीनंतर केंद्रातील सात मोटारी महापुराच्या पाण्यात सापडल्या आहेत. गुरुवारीसुध्दा या मोटारी आठ फूट खोल पाण्याखाली होत्या. गुरुवारी पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी जोखीम घेऊन पुराच्या पाण्यात उतरुन त्या खोलण्याचा प्रयत्न करत होते. काही मोटारी त्यांनी खोलल्याही आहेत. आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत जर नदीची पातळी कमी झाली तर या मोटारी खोलणे शक्य होणार आहे. त्यानंतर पुढे दोन ते तीन दिवस त्यांच्या दुरुस्तीला लागणार आहेत.
आज (शुुक्रवारी) जर मोटारी बाहेर काढण्यात यश आले तर युध्दपातळीवर त्यांच्या दुरुस्तीसह पंपसेट बेअरिंग बदलणे, ट्रान्स्फॉर्मर ओव्हरऑईलींग व चाचणी, ३३ के. व्ही.चा स्वीचयार्ड ओव्हरऑईलींग करण्याची कामे करावी लागणार आहेत. या कामांना वेळ लागणार आहे. तरीही दिवस-रात्र काम करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता जयेश जाधव यांनी सांगितले.
गुरुवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शिंगणापूर केंद्राला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. यावेळी जलअभियंता अजय साळुंखे, उपअभियंता जयेश जाधव उपस्थित होते.
- कामाला विलंब होण्याची कारणे -
१. शिंगणापूर उपसा केंद्रात एकूण सात मोटारी.
२. ४३५ एच. पी.च्या पाच मोटारी असून, प्रत्येक मोटारीचे वजन पाच टन.
३. ५४० एच. पी.ची एक मोटार असून, तिचे वजन सहा टन.
४. ७१० एच. पी.ची एक मोटार असून, तिचे वजन आठ टन.
५. एवढ्या वजनाच्या मोटारी उचलण्यास क्रेन लागते.
६. क्रेनसह अन्य वाहने जाण्याचा रस्ता अद्यापही पाण्यात.
७. मोटारी मोठ्या असल्याने हिटींगला पंधरा तास लागतात.
८. एकावेळी फक्त दोनच मोटारी हिटींग करता येतात.
चौकट -
- ३२ लाख लीटर पाणी पुरवठा -
शहरातील साठ टक्के भागातील नागरिकांची पाण्यावाचून मोठी कुचंबणा झाली आहे. शुक्रवारपासून पाणी पुरवठा खंडित झाला असून, आठ दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने नागरिकांची घालमेल सुरु आहे. टँकरद्वारे पाणी मिळण्यासही प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना दिवस पाणी मिळवण्यातच घालवावा लागत आहे. गुरुवारी पालिकेच्या ७५ टँकरसह खासगी टँकरच्या ३२७ फेऱ्यांद्वारे ३२ लाख ७० हजार लीटर पाणी देण्यात आले.