सांगली-औदुंबर जलवाहतूक सुरू करा
By Admin | Updated: May 29, 2015 00:03 IST2015-05-28T23:40:02+5:302015-05-29T00:03:00+5:30
संजयकाका पाटील : गडकरी यांच्याकडे मागणी करणार

सांगली-औदुंबर जलवाहतूक सुरू करा
सांगली : सांगली ते कसबे डिग्रज व तेथून औदुंबरपर्यंत कृष्णा नदीतून जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती खा. संजयकाका पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. गडकरी शुक्रवार, दि. २९ रोजी सांगली दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध समस्याही त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, सांगली, कसबे डिग्रज व औदुंबर येथे कृष्णा नदीत बंधारे आहेत. कृष्णाकाठच्या लोकांना बंधाऱ्यावरून नदी पार करावी लागते. पावसाळ्यात नदीला पाणी वाढले की पलीकडे जाता येत नाही. यामुळे जलवाहतूक सुरूकेल्यास लोकांचे प्रश्न मिटतील. तसेच विकासाच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी सांगलीतील बंधाऱ्यापासून कसबे डिग्रज व तेथील बंधाऱ्यापासून औदुंबरच्या बंधाऱ्यापर्यंत जलवाहतूक सुरू करावी, अशी मागणी शुक्रवारी गडकरी यांच्याकडे करणार आहोत. केवळ मागणी करून थांबणार नाही, तर त्याचा भविष्यात पाठपुरावा करून हे काम मार्गी लावले जाईल.
ते म्हणाले, सांगली-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गतीने व राष्ट्रीय महामार्गाच्या निकषाने व्हावे, यासाठी या कामाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी मागणीही गडकरी यांच्याकडे केली जाणार आहे. चौपदरीकरणामुळे अपघातांना आळा बसणार आहे. यासाठी त्याचे काम चांगले व्हावे, अशी सांगली, कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. हे काम गतीने व्हावे, यासाठीही चर्चा करणार आहे. गुहागर-विजापूर या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, तसेच धुळे, अहमदनगर, बारामती, विटा, तासगाव, काकडवाडी, मिरज, म्हैसाळ ते बेळगाव या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केला जावा, अशीही मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)