अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ
By Admin | Updated: July 2, 2015 00:23 IST2015-07-02T00:12:00+5:302015-07-02T00:23:25+5:30
विद्यार्थी, पालकांची धावपळ : पहिल्या दिवशी ८२ पैकी ६२ तक्रारी अमान्य

अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ
कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असलेल्या अकरावीच्या प्रत्यक्ष प्रवेशाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यात पहिल्याच दिवशी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या तक्रार निवारण केंद्रांवर विविध स्वरूपांतील तक्रारी दाखल झाल्या. दिवसभरात ८२ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
त्यापैकी १५ मान्य, ५ प्रलंबित ठेवल्या असून, ६२ तक्रारी अमान्य केल्या आहेत.
अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने मंगळवारी (दि. ३०) निवड यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर निवड यादीनुसार मिळालेल्या शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संबंधित महाविद्यालयांत गर्दी होवू लागली. तासाभरात याठिकाणी त्यांच्या रांगा लागल्या. प्रवेश निश्चितीसाठी अधिकतर विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत महाविद्यालयांमध्ये आले होते. आपल्या पाल्यांचा अर्ज भरण्यापासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत त्यांची धावपळ सुरू होती.
अर्ज भरताना विषयांची निवड, प्रवेश शुल्क, महाविद्यालयांतील सुविधा यांची ते बारकाईने माहिती घेत होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, तक्रार अर्ज दाखल करण्याच्या विद्यार्थी आणि पालकांच्या धावपळीमुळे महाविद्यालये गर्दीने फुलून गेली होती. पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
बऱ्याच विद्यार्थ्यांना सोईस्कर आणि ठराविक महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा असतो. त्यामुळे नको असलेले महाविद्यालय मिळालेल्या अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमवेत तक्रार निवारण केंद्रांकडे धाव घेतली. समितीने नियुक्त केलेल्या तिन्ही शाखांच्या तक्रार केंद्रांवर दिवसभरात एकूण ८२ तक्रारी दाखल झाल्या. त्यात कॉलेजसाठी शहराबाहेरून यावे लागते, कॉलेज लांब आहे, अशा विविध स्वरूपांतील तक्रारींचा समावेश होता. विज्ञान शाखेसाठी ७८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील १२ मान्य, ६१ अमान्य आणि ५ तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आला. वाणिज्य शाखेसाठी चार तक्रारी दाखल झाल्या होत्या. यातील तीन मान्य आणि एक अमान्य करण्यात आली. कला शाखेसाठी एकही तक्रार दाखल झाली नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची मुदत शनिवार (दि. ४)पर्यंत आहे. (प्रतिनिधी)
शाखानिहाय ‘कट आॅफ लिस्ट’ (टक्के)
महाविद्यालयविज्ञानवाणिज्यकला
न्यू कॉलेज९१.२०८१.४०७२.८०
विवेकानंद महाविद्यालय९०.८०७७.८०५६.६०
राजाराम कॉलेज८८.८०- ६३.००
गोखले कॉलेज८०.२०५४.०० ४६.६०
कमला कॉलेज८५.६०८१.४० ४९.६७
एस. एम. लोहिया ज्यु. कॉलेज ८८.८०७२.६०६७.८०
कॉमर्स कॉलेज- ७३.६०-
शहाजी कॉलेज- ६०.००४६.००
महावीर कॉलेज४१.२०५८.२०३७.८०
महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज ८७.४०७२.८०६७.४०
मेन राजाराम हायस्कूल व ज्यु. कॉलेज८५.२०७१.४०६०.६०
राजर्षी छ. शाहू महाराज७८.८०-५४.६०
हायस्कूल व ज्यु. कॉलेज
राजर्षी छ. शाहू कॉलेज,७१.००७२.२०३५.२३
कदमवाडी रोड
विद्यापीठ ज्यु. कॉलेज८१.४०६६.००५१.४०
प्रिन्सेस पद्माराजे ज्यु. ८१.४० ७२.२० ५८.००
कॉलेज फॉर गर्ल्स