अंबाबाई मूर्ती संवर्धन सोहळ्यास प्रारंभ
By Admin | Updated: July 23, 2015 00:32 IST2015-07-23T00:25:01+5:302015-07-23T00:32:40+5:30
मंत्रोच्चाराचा गजर : शाहू महाराजांच्या हस्ते अभिषेक, धार्मिक विधी पाहण्यास भाविकांची गर्दी

अंबाबाई मूर्ती संवर्धन सोहळ्यास प्रारंभ
कोल्हापूर : यज्ञ मंडपात विविध देवतांची स्थापना, श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते अंबाबाईची महापूजा, कलाकर्षण विधी, कुष्मांड होम, श्रीकर नारायण विधी, देवी भागवत पारायण, वेदमंत्रांचा उच्चार, यज्ञांनी वातावरणात आलेली शुद्धता, श्रीपूजकांच्या मांदियाळीत भक्तिरसाचा अनुभव सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी, त्यात पावसाच्या सरी, अशा धार्मिक वातावरणात बुधवारी करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेसाठी विधींचा प्रारंभ झाला.
सकाळी आठ वाजता सर्व श्रीपूजकांकडून महासंकल्प करून घेण्यात आला. यात अनुष्ठानांचा उल्लेख करून हे सर्व विधी व मूर्ती संवर्धन प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी देवीला प्रार्थना करण्यात आली. महासंकल्पास खातेदार श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांनी पुण्याहवनाचा विधी केला. त्यानंतर अंबाबाईचा नित्य अभिषेक करण्यात आला. यज्ञ मंडपात अंबाबाईचा चांदीचा रथ आणि देवीला अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या सिंहासनावर देवीच्या मूर्तीची प्रतिकृती बसविण्यात आली आहे. त्याशेजारी महाकाली, महासरस्वती आणि कोल्हापुरातील पीठस्त देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या आहेत. येथे स्थानशुद्धीसाठी उदकशांती विधी झाला.
सकाळी साडेदहा वाजता छत्रपती श्रीमंत शाहू महाराजांचे मंदिरात आगमन झाले. मुख्य आचार्य सुहास जोशी व संजीव मुनिश्वर यांच्या पौरोहित्याखाली शाहू महाराजांनी देवीच्या उत्सवमूर्तीस अभिषेक केल्यानंतर त्यांनी आणलेले महावस्त्र मूर्तीला नेसवून आरती झाली. त्यानंतर शाहू महाराजांनी मुख्य यज्ञ मंडपात पंचोपचार पूजन केले. अजित ठाणेकर व केदार मुनिश्वर यांनी त्यांना सर्व कार्यक्रमांविषयी माहिती सांगितली.
श्रीकर नारायण विधीदरम्यान देवी भागवत संहिता पारायणाचा प्रारंभ झाला. प्रख्यात संस्कृत अभ्यासक वि. गो. देसाई हे वाचक असून, नीलेश व अमिता ठाणेकर या दाम्पत्याने यजमान म्हणून संकल्प केला. बुधवारचे विधी धारवाडचे पंडित राजेश्वरशास्त्री जोशी व औदुंबरचे पंडित वेंकटरमणशास्त्री दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. (प्रतिनिधी)
अरणि मंथनाने अग्नी...
बुधवारी श्रीकर नारायण हा मुख्य विधी करण्यात आला. श्री लक्ष्मीच्या अनुष्ठानाआधी करण्यात आलेल्या या विधीत अग्नीदेवतेस आवाहन करून अरणि मंथनाने नैसर्गिकरीत्या अग्नी उत्पन्न करण्यात आला. तो अग्नी यज्ञकुंडात स्थापित करून हवनास सुरुवात झाली. माधव व मृणाल मुनिश्वर यांनी यजमानपद भूषवले.