(स्टार १०६६) हातांना नाही काम, घरफोड्या वाढल्या; कळंबा कारागृहात ४० टक्के कैदी बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:14+5:302021-08-20T04:29:14+5:30
कोल्हापूर : हातांना काम नसल्याने घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने एकूण गुन्हेगारीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी वाढल्याने आपोआपच ...

(स्टार १०६६) हातांना नाही काम, घरफोड्या वाढल्या; कळंबा कारागृहात ४० टक्के कैदी बेरोजगार
कोल्हापूर : हातांना काम नसल्याने घरफोडी, चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने एकूण गुन्हेगारीत कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी वाढल्याने आपोआपच कारागृहात कैद्यांची गर्दी होते. असाच अनुभव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहाच्या बाबतीत दिसून येत आहे. या कारागृहात दाखल झालेले विविध गुन्ह्यांतील कैदी हे बेरोजगार असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहात विविध कारणांस्तव शिक्षा भोगणारे तसेच न्यायालयीन कैदी असे सुमारे २६६३ कैदी आहेत; पण कोरोना कालावधीत त्यांपैकी पॅरोल रजेवर सुमारे ६९५, न्यायालयीन कैदी १२३३ तर सिद्धदोष झालेले ७३५ कैदी आहेत. त्यांपैकी पॅरोल रजेवर बाहेर गेल्यानंतर सद्य:स्थितीत कारागृहात सुमारे १९६८ कैदी आहेत. कारागृहात असणाऱ्या कैद्यांमध्ये बहुतांश कैदी हे बेरोजगार असल्याने त्यांच्या हातून गुन्हे घडल्याचे दिसून येते. त्यापाठाेपाठ शेतमजूर कैद्यांची संख्या दिसून येते.
दरम्यान, कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी कारागृहात येण्यापूर्वी बेरोजगार असला तरी त्याला आत आल्यानंतर त्याच्या कुवतीनुसार आतच रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
१) कोणत्या गुन्ह्यातील किती कैदी (टक्केवारी)
चोरी व घरफोडी : २०
बलात्कार : १५
खून व खुनाचा प्रयत्न : २०
हेतू नसताना खून : ०४
विनयभंग : ०३
इतर : १७
कोणत्या वयोगटातील किती कैदी
वयोगट : कैदी (टक्केवारी)
१८ ते २१ : २०
२२ ते ३० : २५ ते ३०
३१ ते ४० : ३०
४१ ते ५० : १५
५१ पेक्षा जास्त : १४
३) कोणते कैदी किती (टक्केवारी)
शासकीय नोकरदार : ०१
व्यापारी : ०२
शेतकरी : ०५
शेतमजूर : ३०
बेरोजगार : ४०
कोट...
कारागृहात कैदी येण्यापूर्वी बेरोजगार असला तरीही त्याला कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याला कौशल्यानुसार काम दिले जाते. त्यातून त्याला मिळणाऱ्या पैशांतून त्याला खर्च करण्याची मुभा राहते. तसेच कारागृहात त्याच्या हाताला कामाचे वळण लागते.
- चंद्रमणी इंदूरकर, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती जिल्हा कारागृह, कोल्हापूर