कोल्हापूर पोलिसांचे पदसंचलन : आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी असणार कडेकोट बंदोबस्त

By Admin | Updated: September 8, 2014 00:07 IST2014-09-08T00:06:38+5:302014-09-08T00:07:04+5:30

व्हाईट आर्मीची पथके...आपत्कालीन कक्षात हे असणार...रंकाळा खण विसर्जन तयारी पूर्ण...मद्यपींवर कठोर कारवाई

Stage of Kolhapur Police: Stuck-settlement arrangements for Ganesh immersion today | कोल्हापूर पोलिसांचे पदसंचलन : आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी असणार कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर पोलिसांचे पदसंचलन : आज होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी असणार कडेकोट बंदोबस्त

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज, रविवार पोलीस बंदोबस्त वाटपाचे नियोजन करण्यात
आले. सुमारे ४० तास शहरातील मिरवणूक मार्गावर प्रत्येक नागरिकांच्या हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलीस लक्ष ठेऊन असणार आहेत. चौका-चौकांत, गल्ली-बोळांत पोलीस असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रमुख मार्गावर पोलीस दलातर्फे पदसंचलन करण्यात आले. या संचलनामध्ये पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांच्यासह १५ पोलीस निरीक्षक, ६२ साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ७४१ कॉन्स्टेबल, २९८ होमगार्डस, २ राज्य राखीव दल कंपनी, ८ स्ट्रायकिंग फोर्स यांचा समावेश होता. सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला उद्या, सोमवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ होत आहे. मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालय येथे आज बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, गृह पोलीस उपअधीक्षक किसन गवळी, करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव आदींनी बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांना मार्गदर्शन केले. तसेच मिरवणूक मार्गावरील जागेची पाहणी स्वत: पोलीस अधीक्षक जाधव यांनी केली. मिरवणुकीचा मुख्य मार्ग मिरजकर तिकटी मार्गे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, गंगावेश, जामदार क्लबमार्गे पंचगंगा घाट असा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे साध्या वेशात पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक नागरिकांची हालचाल टिपणार आहे. उभारण्यात आलेल्या टेहळणी मनोऱ्यावरूनही दुर्बिणीच्या साहाय्याने पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत. संवेदनशील ठिकाणी शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

हिंदवी स्पोर्टस् : अत्याधुनिक लेझर शो, शार्पी लाईट, एलईडी वॉल, फ्लार्इंग मशीन, एअरशीप कॅमेरा, रात्रीच्या वेळी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हातात वेगळ्या प्रकारच्या ५०० स्टीक कँडल तसेच व्हिडीओ जॉकी, वाय-फाय यंत्रणा
उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ : पुणे येथील डीजेसह डॉल्बी सिस्टिम
महाकाली तालीम भजनी मंडळ (संध्यामठ) : अमृतमहोत्सवानिमित्त डॉल्बीसह पारंपरिक वाद्ये
लेटेस्ट तरुण मंडळ (मंगळवार पेठ) : वन्यप्राणी वाचवा हा संदेश जनमाणसांत रूजविण्यासाठी वन्य प्राण्यांची प्रतिकृती असणारा ‘लेटेस्ट अ‍ॅनिमल पार्क’
गोल सर्कल (रंकाळा वेश): पुणे येथील ६४ जणांचे ढोल पथक
श्री तरुण मंडळ (कोष्टी गल्ली नंबर दोन) : कुके सुब्रम्हण्यम
नाग गणेश रथ
पाटाकडील तालीम मंडळ : पुणे येथील साऊंड सिस्टीम आणि लेझर शो, ७० जणांचे नाशिक ढोलपथक
खंडोबा तालीम मंडळ : अबालवृध्दांचा समावेश, टाळ्यांच्या गजर करत शांततेत मिरवणूक
श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ : विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणार नसून पारंपरिक पद्धतीचा समावेश. मिरवणुकीत दोनशे वारकरी भजन आणि टाळ-मृदंगाचा गजर करणार आहेत.
दयावान ग्रुप: डोळ्यांचे पारणे फेडणारा जर्मन ट्रान्स लाईट शो आकर्षण असणार आहे. ट्रान्स या थिरकायला लावणाऱ्या संगीताच्या प्रकारावर लाईट शोचा अनुभव घेता येणार आहे.

व्हाईट आर्मीची पथके...
आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी ‘जीवनमुक्ती सेवा संस्था’ (व्हाईट आर्मी)ची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर व पापाची तिकटी या ठिकाणी आपत्ती पथके ठेवण्यात आली आहेत. पॉकेट लाईनच्या आधारे गर्दीवर नियंत्रण करणे, जाणे-येणे मार्गांमध्ये व्यवस्था लावणे, आदी कामे व आपत्तीवेळी नियोजनबद्ध प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. यासाठी प्रत्येक टीममध्ये पाच व्हाईट आर्मीचे जवान डॉक्टर टीमसोबत कार्यरत राहणार आहेत.
आपत्कालीन कक्षात हे असणार...
दोरखंड, फायर एक्सटिंग्युशर व रुग्णवाहिका असणार आहे. यासाठी सीपीआर, श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्री पूजक मंडळ, अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट यांच्या रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली आहे.
नदीघाटावर यांत्रिक बोट, आपत्ती कक्ष...
पंचगंगा नदी घाटावर विसर्जनावेळी पाण्यातील दुर्घटना टाळण्यासाठी व्हाईट आर्मीची सुसज्ज यांत्रिक बोट व वॉटर रेस्क्यू टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच नदीघाटावर लक्ष ठेवण्यासाठी आपत्ती कक्ष उभा करण्यात आला आहे.

रंकाळा खण विसर्जन तयारी पूर्ण...
साने गुरुजी वसाहतीकडे जाणाऱ्या क्रशर चौकातील (तलवार चौक) रंकाळा खण व मत्स्यबीज केंद्राजवळील या दोन्ही बाजूस महापालिकेच्यावतीने लोखंडी बॅरेकेट्स व मंडप उभा करण्यात आला आहे. तसेच हॅलोजन (विद्युत व्यवस्था) लावले आहेत. त्याचबरोबर खणीची पूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. यासाठी ३५ कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.

मद्यपींवर कठोर कारवाई
प्रत्येक चौकात ब्रिथ अ‍ॅनालायझरचा वापर करण्यात आला असून, दारू पिऊन अथवा मादक द्रव्य घेऊन येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाज व टवाळखोर व्यक्तींकडून महिलांना होणारा त्रास रोखण्यासाठी पोलिसांचे छेडछाडविरोधी पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी चौकाचौकात तंबू उभे केले आहेत.

सीपीआरच्या तीन रुग्णवाहिका; तीन वैद्यकीय पथके
सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, पंचगंगा नदी व इराणी खण येथे प्रत्येकी एक अशा तीन रुग्णवाहिका व तीन वैद्यकीय पथके ठेवली आहेत. वैद्यकीय पथकात प्रत्येकी चार असे एकूण १२ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी मिरवणूक संपेपर्यंत कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर गरज पडल्यास सीपीआरमध्ये ३५ ते ४० जादा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांनी सीपीआरमधील अपघात विभाग ०२३१-२६४०७४४ व १०८ नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांनी केले आहे.

Web Title: Stage of Kolhapur Police: Stuck-settlement arrangements for Ganesh immersion today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.