सहलीसाठी एस.टी. सुरक्षित

By Admin | Updated: November 28, 2014 00:03 IST2014-11-27T23:47:10+5:302014-11-28T00:03:14+5:30

शाळांचे प्राधान्य : वर्षभरात सुमारे एक हजार एस.टी. बसेसची नोंदणी

ST for trip Secure | सहलीसाठी एस.टी. सुरक्षित

सहलीसाठी एस.टी. सुरक्षित

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -चार भिंतींच्या आतील शिक्षणासह व्यावहारिक जगाचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने शाळांकडून विद्यार्थी सहलींचे नियोजन केले जाते. पण, गेल्या काही वर्षांपासून सहलींसाठी खासगी आरामगाड्या घेण्याची प्रथा सुरू झाली. त्यातील अपघातांचे प्रकार घडल्यानंतर आता अनेक शाळा दक्ष झाल्या आहेत.त्यामुळे या शाळांकडून एस.टी. बसला पसंती मिळत आहे.
गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यांतील शाळांनी राज्य परिवहन महामंडळाच्या दहा आगारांतून एक हजार १३३ एस.टी.बसची नोंदणी करून ‘एस.टी.बसचा प्रवास, सुरक्षित प्रवास’ हे कृतीतून दाखवून दिले आहे. प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही स्तरांवर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत या सहलींचे आयोजन करण्यात येते. महामंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी प्रासंगिक करारावर महामंडळाकडून ५० टक्के सवलतीने गाड्या दिल्या जातात. त्यांच्यासाठी ४५ आसनांच्या गाड्या पुरविल्या जातात. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, जन्मतारीख यांची नोंद घेतल्याशिवाय संबंधित शाळेला सहलीसाठी गाडी दिली जात नाही. तसेच एका बसमध्ये दोन शिक्षक किंवा दोन सहकर्मचारी असे एकूण चौघांना बसण्याची परवानगी दिली जाते.
शैक्षणिक सहलीला एस.टी.नेच जा, असा सल्ला शिक्षण विभाग देत असला, तरी अनेक शाळा खासगी गाड्यांना पसंती देतात. यामुळे काही वेळा अपघात घडले आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून शालेय सहलीसाठी एस.टी. बस असल्याशिवाय परवानगीच दिली जात नाही. काही खासगी शाळांना याचे बंधन नसल्याने ते खासगी वाहन घेऊन सहलीला जातात. यासाठी शैक्षणिक विभागाच्यावतीने कडक पावले उचलण्याची गरज आहे.


५0 टक्के सवलत
राज्य परिवहन महामंडळातर्फे शैक्षणिक सहलीसाठी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना नैमित्तिक कराराच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात येते. एस.टी.चे चालक हे प्रशिक्षित असतात. सर्व गाड्यांची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यामुळे सुरक्षित व सोईस्कर प्रवासासाठी शाळा राज्य शासनाच्या एस.टी.चा वापर करतात.


शालेय सहलीसाठी एस.टी.चा वापर करण्यासाठी विभाग नियंत्रकांमार्फत आम्ही शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना आवाहन केले आहे. गतवर्षी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकावरून १६७ एस.टी. सहलीसाठी गेल्या होत्या. यंदा २०० गाड्या पुरविण्याचा आमचा मानस आहे.
- अभय कदम,
स्थानक प्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक कोल्हापूर

Web Title: ST for trip Secure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.